काश्मीरमध्ये पेच कायम; पीडीपी-भाजपा समझोत्याचे संकेत
By admin | Published: January 1, 2015 03:26 AM2015-01-01T03:26:35+5:302015-01-01T03:26:35+5:30
चार पक्षांनी हालचाली चालवल्या असतानाच पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी दिलेल्या सकारात्मक संकेतांनी भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत़
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
जम्मू-काश्मिरात सरकार स्थापनेबाबत सर्व प्रमुख चार पक्षांनी हालचाली चालवल्या असतानाच पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी दिलेल्या सकारात्मक संकेतांनी भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत़ भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी मेहबुबा यांच्या ताज्या विधानाचे स्वागत केले असून, आम्ही पीडीपीसोबतच्या औपचारिक चर्चेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा करीत असल्याचे म्हटले आहे़
मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी राज्यपाल एऩ एऩ व्होरा यांची भेट घेतली़ यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपाला सोबत घेण्यास पक्षाला कुठलीही हरकत नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले़ पीडीपीला काश्मीर खोऱ्यात ‘बहुमत’ मिळाले आहे, तर भाजपाला जम्मूत ‘कौल’ मिळाला आहे़ राजकीय पक्षांनी या जनादेशाचा सन्मान करायला हवा, असे मुफ्ती म्हणाल्या़ मुफ्तींचे हे विधान सरकार स्थापनेच्या दिशेने सकारात्मक संकेत असल्याचे भाजपा मानत आहे़