काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा, फारुक अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 03:39 AM2020-10-20T03:39:28+5:302020-10-20T07:02:01+5:30
फारुक अब्दुल्ला यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर राज्याला पूर्वीप्रमाणेच विशेष दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सहा पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे.
नवी दिल्ली :जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारुक अब्दुल्ला यांची श्रीनगर येथे चौकशी केली. त्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सने निषेध नोंदविला आहे.
फारुक अब्दुल्ला यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर राज्याला पूर्वीप्रमाणेच विशेष दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सहा पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळेच राजकीय सूडबुद्धीने फारुक अब्दुल्ला यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली. ईडीने फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानावर छापे न घालता त्यांना फक्त चौकशीसाठी बोलाविले. यातही धूर्त खेळी आहे. आपल्यावर कोणीही दोषारोप करणार नाही याची चौकशी करणाऱ्यांनी काळजी घेतली आहे.
जम्मू-काश्मीरचा रद्द केलेला दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा यासाठी सहा पक्षांनी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला, ती बैठक फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली होती. त्या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन, पीपल्स मूव्हमेंटचे नेते जावेद मीर, सीपीआय (एम)चे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी, अवामी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष मुजफ्फर शाह उपस्थित होते.
४३.६९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप
2005-2012 या कालावधीत जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन या संस्थेमध्ये 43.69 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फारुक अब्दुल्लांसह दहा पदाधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रीडा संघटनेचे कर्ज देणाºया संस्थेत रूपांतर केल्याचा तसेच अनेक बनावट खाती उघडून हे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.