काश्मीरसाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही
By admin | Published: July 25, 2016 03:48 AM2016-07-25T03:48:53+5:302016-07-25T03:48:53+5:30
काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, असे सांगतानाच काश्मीरमधील जनतेशी आम्हाला भावनात्मक संबंध हवे आहेत
श्रीनगर : काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, असे सांगतानाच काश्मीरमधील जनतेशी आम्हाला भावनात्मक संबंध हवे आहेत, असे मत गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. तथापि, भारताच्या अंंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नका, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.
राज्यातील दोन दिवसीय दौरा पूर्ण केल्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, राज्यात सद्या शांततेची गरज आहे. त्यानंतर आवश्यक वाटेल त्या प्रत्येकाशी चर्चा करण्यात येईल. दरम्यान, यावेळी पाकिस्तानवर टीका करताना ते म्हणाले की, काश्मीरबाबतचा आपला दृष्टिकोन पाकिस्तानने बदलावा. काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही. पाकिस्तान स्वत:च दहशतवादाने पीडित आहे. एकीकडे दहशतवाद संपविण्यासाठी ते लाल मशिदीत प्रवेश करुन अतिरेक्यांना मारत आहेत. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये आमच्या तरुणांना हत्यारे घेण्यास सांगत आहे. हे थांबायला हवे.
मेहबुबा मुफ्तींसोबत चर्चा
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी येथे राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्य सरकारमधील काही मंत्रीही उपस्थित होते. राजनाथसिंह हे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, राजनाथ सिंह
यांनी येथे सत्ताधारी पीडीपी,
भाजप तसेच विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फ्रेसच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. (वृत्तसंस्था)
काश्मिरात पाच जिल्ह्यांत कर्फ्यू; जनजीवन विस्कळीतच
काश्मिरात अनेक भागांत तणावपूर्ण वातावरण असून, पाच जिल्ह्यांत काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सलग १६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग, कुलगाम, कुपवाडा, पुलवामा व श्रीनगर येथे आठ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली. चार जिल्ह्यांत बांदीपोरा, बारामूल, बडगाम आणि गंदेरबाल येथे संचारबंदी हटविण्यात आली, पण या जिल्ह्यात चारपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र फिरण्यास बंदी आहे.