Kashmir Files: 1990 मध्ये न डगमगलेले काश्मीरी राजपूत आता बिथरले; घाटी सोडण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:46 PM2022-04-14T12:46:42+5:302022-04-14T12:47:37+5:30
Hindu Targeted in Kashmir Valley: दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग सुरु केल्याने काश्मीर सोडण्याच्या धमकीमुळे पुन्हा एकदा दहशत पसरली आहे.
कुलगाममध्ये ड्रायव्हरच्या हत्येनंतर काश्मीरी हिंदूंना पुन्हा एकदा १९९० च्या काश्मीर हत्याकांडाची भीती वाटू लागला आहे. गेल्या ११ दिवसांत सहाव्यांदा हिंदूंवर हल्ला झाल्याने काश्मीरी पंडितांच्या हत्येवेळी न डगमगलेले राजपूत बिथरले आहेत. दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग सुरु केल्याने काश्मीर सोडण्याच्या धमकीमुळे पुन्हा एकदा दहशत पसरली आहे.
सतीश कुमार सिंह या ५५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला आहे. यावर आता राजपूतांकडून प्रतिक्रिया आली आहे. त्यांना जर आमच्यापासून त्रास होत असेल तर आम्ही इथून जाण्यास तयार आहोत, असे कुलगामच्या काकरान गावाचे प्रमुख जगदीश सिंह यांनी म्हटले आहे. सतीश यांच्या मृतदेहानंतर काश्मीर सोडण्याची चिठ्ठी सापडली. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यातील काही भागात राजपूत कुटुंबे राहतात. त्यांनी कितीही बिकट परिस्थिती आली तरी काश्मीर सोडले नाही.
ही कुटुंबे सफरचंदाचा व्यापार करतात. अचानक त्यांच्या जिल्ह्याकडे दहशतवाद्यांनी मोर्चा वळविल्याने ते भयभीत झाले आहेत. काही बाहेरच्या शक्तींनी आमच्या गावातील वातावरण बिघडविले आहे. आम्हाला घाटी सोडायची आहे, असे जगदीश सिंह म्हणाले.
गावातील काश्मीरी मुस्लिम मला येऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगत आहेत. घाबरू नका, तुम्ही आमचे भाऊ आहात, असे सांगत आहेत. मात्र, १९९० मध्ये जी भीती काश्मीरी पंडितांना वाटत होती, तीच आता या राजपूतांना वाटू लागली आहे. दहशतवाद्यांनी ११ व्या दिवशी सहाव्या हिंदूला मारले आहे. ते मुद्दाम लक्ष्य करून हे करत आहेत. सतीश हे त्यांच्या घरात बसलेले होते, इफ्तार सुरु होता, तेवढ्यात दोन लोक आले आणि त्यांना बाहेर बोलावले. काही महत्वाचे बोलायचे आहे असे ते म्हणाले. यानंतर त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. रमजानच्या महिन्यातच दहशतवाद्यांनी हे कृत्य केले.
यानंतर काश्मीरी कॉलोनीमध्ये एक चिठ्ठी सापडली. 'लश्कर ए इस्लाम' नावाच्या दहशतवादी संघटनेने ही चिठ्ठी एका घरावर चिकटविली आहे. यामध्ये एकतर घाटी सोडा किंवा मरण्यास तयार रहा अशी धमकी देण्यात आली आहे. एका न्यूज चॅनेलला जगदीश यांनी ही माहिती दिली आहे. एनबीटीने याचे वृत्त दिले आहे.