काश्मीरचे पहिले मल्टिप्लेक्स पुढील महिन्यात सुरू होणार, एकाचवेळी तीन चित्रपटगृहांचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:26 AM2022-08-16T10:26:53+5:302022-08-16T10:27:34+5:30

आघाडीची साखळी चित्रपटगृह कंपनी आयनॉक्सच्या भागीदारीतून या मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात येत आहे.

Kashmir first multiplex opens next month, the joy of three theaters simultaneously | काश्मीरचे पहिले मल्टिप्लेक्स पुढील महिन्यात सुरू होणार, एकाचवेळी तीन चित्रपटगृहांचा आनंद!

काश्मीरचे पहिले मल्टिप्लेक्स पुढील महिन्यात सुरू होणार, एकाचवेळी तीन चित्रपटगृहांचा आनंद!

Next

श्रीनगर : काश्मिरातील चित्रपट रसिक सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील. कारण, पुढच्या महिन्यात सोनवर भागात खोऱ्यातील पहिले मल्टिप्लेक्स सुरू होणार आहे. 

आघाडीची साखळी चित्रपटगृह कंपनी आयनॉक्सच्या भागीदारीतून या मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात येत आहे. यात एकूण तीन चित्रपटगृहे असतील व ५२० प्रेक्षक बसू शकतील, असे या मल्टिप्लेक्सचे मालक विजय धर यांनी सांगितले. पुढील महिन्याच्या प्रारंभी हे मल्टिप्लेक्स रसिकांच्या सेवेत रुजू होण्याची आशा आहे. 

धर यांचे श्रीनगरजवळील अथवाजन भागात दिल्ली पब्लिक स्कूल आहे. सुरुवातीला तीनपैकी दोन पडद्यांवर चित्रपटांचे प्रदर्शन सुरू होईल तर तिसऱ्या पडद्यावर ऑक्टोबरपासून चित्रपट पाहता येतील. मल्टिप्लेक्सचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, लोकार्पणापूर्वी अंतिम टप्प्यातील काम पूर्ण करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. 

उत्तर भारतातील सर्वाेत्कृष्ट चित्रपटगृह ब्रॉडवेच्या जागेवर या मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात आली आहे. हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे क्षेत्र असून, भारतीय लष्कराच्या १५ व्या तुकडीचे मुख्यालयही जवळच आहे. (वृत्तसंस्था)

दहशतवाद्यांच्या धमकीमुळे पडदे अंधारले
    १९८० च्या दशकापर्यंत खोऱ्यात डझनभर सिंगल स्क्रीन (एकल पडदा) चित्रपटगृहे होती. तथापि, दोन दहशतवादी संघटनांनी चित्रपटगृह मालकांना धमकावल्यानंतर या चित्रपटगृहांच्या पडद्यावर काळोख पसरला. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रशासनाने चित्रपटगृहे पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सप्टेंबर १९९९ मध्ये लाल चौकाच्या हृदयस्थानी असलेल्या रिगल चित्रपटगृहात दहशतवाद्यांनी ग्रेनेड स्फोट घडवून आणल्यानंतर या प्रयत्नांना धक्का बसला. 
    नीलम व ब्रॉडवे या चित्रपटगृहांनी रसिकांसाठी दरवाजे उघडले. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनाही चित्रपट प्रदर्शन थांबवावे लागले होते. सरकारने विभागात चित्रपट उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी नवे चित्रपट धोरण राबविण्यास सुरुवात केली असून, यात चित्रपटगृह सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

Web Title: Kashmir first multiplex opens next month, the joy of three theaters simultaneously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.