काश्मिरात पुन्हा पुराचे थैमान; झेलम कोपली
By admin | Published: March 30, 2015 11:22 PM2015-03-30T23:22:53+5:302015-03-30T23:22:53+5:30
सात महिन्यांपूर्वी विध्वंसकारी महापुराचा सामना करणाऱ्या काश्मिरात पुन्हा एकदा पुराने थैमान घातले आहे. संततधार पावसाने सोमवारी खोऱ्यातील झेलम नदीने
श्रीनगर : सात महिन्यांपूर्वी विध्वंसकारी महापुराचा सामना करणाऱ्या काश्मिरात पुन्हा एकदा पुराने थैमान घातले आहे. संततधार पावसाने सोमवारी खोऱ्यातील झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर बडगाम जिल्ह्यात चार ते पाच घरे दरडीखाली दबल्याने १० जण ठार झाले असून २१ लोक बेपत्ता आहेत. प्रशासनाने काश्मिरात पूरस्थिती जाहीर केली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता खोऱ्यात डेरेदाखल झाले असून केंद्राने पूरग्रस्त जम्मू-काश्मीरला मदत व बचाव कार्याकरिता तातडीने २०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
राज्यात मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदी ओसंडून वाहात आहे.
मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे मंत्र्यांच्या एका गटासह परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. शहरातील काही भागाचा दौराही त्यांनी केला. शाळेची बोर्डाची परीक्षा दोन दिवस स्थगित करण्यात आली असून शाळांना पुढील चार दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग सोमवारी तिसऱ्या दिवशीही बंदच होता. हवामान विभागाने येत्या दिवसात राज्याच्या काही क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या या राज्याला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रलयकारी पुराने उद्ध्वस्त केले होते. यात २८० लोक मृत्युमुखी पडले तर हजारो बेघर झाले होते. (वृत्तसंस्था)