काश्मीर पर्यटकांनी बहरले; गुलमर्गमधील सर्व हॉटेल्स एप्रिलअखेरपर्यंत फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:08 AM2021-02-24T01:08:55+5:302021-02-24T01:09:02+5:30
श्रीनगर : अवघ्या जगाला निसर्ग सौंदर्याने भूरळ घालणारे ‘नंदनवन’ म्हणजे जम्मू-काश्मीरचे ते चांगले दिवस परतल्याचे दिसते. यावर्षी जोरदार बर्फवृष्टी ...
श्रीनगर : अवघ्या जगाला निसर्ग सौंदर्याने भूरळ घालणारे ‘नंदनवन’ म्हणजे जम्मू-काश्मीरचे ते चांगले दिवस परतल्याचे दिसते. यावर्षी जोरदार बर्फवृष्टी झाल्याने अतिरेकी कारवायांग्रस्त जम्मू-काश्मीर निसर्ग सौंदर्यांने नटले आहे. हे सौंदर्य ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी पर्यटकांची पावले जम्मू-काश्मीरकडे पुन्हा वळली आहेत.
गुलमर्गमधील प्रसिद्ध स्की रिसोर्टसह येथील सर्व हॉटेल्स एप्रिलअखेरपर्यंत फुल्ल आहेत. ८ हजार फुट उंचावरील गुलमर्गमधील प्रसिद्ध स्की रिसोर्ट यंदाच्या हिवाळ्यातील मुख्य आकर्षणाचे केंद्र बनले आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पूर्व संध्येला या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी पर्यटकांची गर्दी जमली होती.
मागच्या वर्षी गुलमर्ग येथे आयोजित खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेनंतर राष्ट्रीय स्तरावरील स्कीयर्स गुलमर्ग आणि येथील सौंदर्यांची माहिती मिळाली. यामुळे खेळाडू आणि लोकांना सकारात्मक संदेश मिळाला. गुलमर्गमध्ये जगातील अन्य भागात असलेल्या दर्जेदार सोयी-सुविधा असल्याची जाणीव लोकांना झाली. कोविड-१९ च्या साथीमुळे लोक विदेशात जाऊ शकत नाहीत. भारतीय पर्यटक मात्र मोठ्या संख्येने गुलमर्गला येत आहेत. खेलो इंडियाच्या द्वितीय राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धा गुलमर्गमध्ये २६ फेब्रुवारी ते २ मार्चमध्ये होणार आहे. या स्पर्धेमुळे पर्यटन क्षेत्राला आणखी भरारी मिळेल, अशी आशा हॉटेल व्यावसायिक बाळगून आहेत. यातून काश्मीर हे पर्यटनांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचा संदेश प्राप्त होतो.
सर्वच वर्गातील पर्यटक दाखल होऊ लागले
गुलमर्ग हॉटेलियर्स क्लबचे प्रवक्ते मुश्ताक शाह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाच्या हॉटेलसह गुलमर्गमधील सर्व हॉटेल्समधील ९०० खोल्या एप्रिलअखेरपर्यंत पर्यटकांनी आरक्षित करण्यात आल्या आहेत. उच्च तसेच अल्प उत्पन्न वर्गातील पर्यटक गुलमर्गला येत आहेत.