स्वर्ग! काश्मीर फुलले पर्यटकांनी, १० वर्षांचा माेडला रेकाॅर्ड; टार्गेट किलिंगचा परिणाम नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:03 AM2022-06-13T07:03:37+5:302022-06-13T10:53:31+5:30
दहशतवादामुळे काश्मीर एकेकाळी पेटले हाेते. दरराेज हत्या हाेत हाेत्या. त्याचा पर्यटनावर माेठा परिणाम झाला हाेता.
श्रीनगर:
दहशतवादामुळे काश्मीर एकेकाळी पेटले हाेते. दरराेज हत्या हाेत हाेत्या. त्याचा पर्यटनावर माेठा परिणाम झाला हाेता. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. माेठ्या प्रमाणावर पर्यटक काश्मीरमध्ये जात आहेत. यावर्षी तब्बल १० लाख पर्यटक काश्मीरमध्ये भ्रमंतीसाठी गेले. यामुळे गेल्या१० वर्षांमधील पर्यटकसंख्येचा विक्रम माेडीत निघाला आहे.
यावर्षी मे महिन्यात ३.७५ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. यावर्षी आतापर्यंत १० लाखांहून अधिक पर्यटकांनी काश्मीरला पसंती दिली आहे. अलीकडे काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या ९ घटना घडल्या. तरीही पर्यटकांच्या संख्येत घट झालेली नाही. हत्या हाेण्यापूर्वी सर्व ६० हजार खाेल्या बुक हाेत्या. आजही तशीच स्थिती आहे, असे ट्रॅव्हल एजंट असाेसिएशनचे अध्यक्ष फारुख कुथू यांनी सांगितले.
अमरनाथ यात्रेची चिंता वाढली
नूपुर शर्मा प्रकरणामुळे काश्मीरमध्ये काही ठिकाणी तणाव आहे. त्यामुळे पर्यटनावर परिणाम हाेण्याची भीती व्यक्त हाेत आहे. तर जूनच्या अखेरीस सुरू हाेणाऱ्या अमरनाथ यात्रेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
ऑक्टाेबरपर्यंत गर्दी
० शाेपिया, बडगाम कुलगाम, बारामुला यासारख्या ठिकाणी टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या. तर पर्यटकांच्या आवडीचे श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, साेनमर्ग इत्यादी ठिकाणी शांतता आहे.
० १५ जुलैपर्यंत हाॅटेल्स फुल आहेत. ऑक्टाेबरपर्यंत गर्दी राहील. खाेल्यांची संख्या कमी असल्यामुळे अडचणी येत आहेत. सरकारने ‘हाेम स्टे’ सुरू केले. तेदेखील फुल आहे.
महिना पर्यटक संख्या
मे २०२२ ३.७५ लाख
एप्रिल २०२१ २.६० लाख
मार्च २०२० १.८० लाख
फेब्रुवारी २०१९ १.०५ लाख