थंडीपासून काश्मीरला दिलासा, तरी पारा शून्याखालीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 10:34 IST2024-12-16T10:33:48+5:302024-12-16T10:34:29+5:30
आदल्या दिवशी रात्री हेच तापमान उणे ४.६ अंश होते.

थंडीपासून काश्मीरला दिलासा, तरी पारा शून्याखालीच
नवी दिल्ली/श्रीनगर : उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी काश्मीर खोऱ्यात मात्र रात्रीचे तापमान थोडे वाढल्याने दिलासा मिळाला आहे. श्रीनगरमध्ये रात्री उणे ३.४ अंश तापमानाची नोंद झाली. आदल्या दिवशी रात्री हेच तापमान उणे ४.६ अंश होते.
काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये किमान तापमान ४ अंशाने वाढून ३.८ अंश नोंदले गेले. अमरनाथ यात्रामार्गावरील भाविकांसाठी असलेल्या मदत छावणीच्या परिसरात पहेलगाममध्ये मात्र किमान तापमान शून्याखाली ४.८ अंशावर आहे. आदल्या दिवशीपेक्षा ते ३ अंश अधिक आहे.
दुसरीकडे काजीगुंडमध्ये किमान तापमान शून्याखाली ४ अंश होते. दरम्यान, काश्मीर खोऱ्यात २१ डिसेंबरपर्यंत हवा कोरडी राहण्याची शक्यता असून या भागात तापमान आणखी उतरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नव्याने थंडीची लाट येऊ शकते. रविवारी राजस्थानच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी होती. फतेपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमान शून्याखाली १.२ अंश नोंदविले गेले.