काश्मीर सरकारची घोषणा होणार पुढील आठवड्यात?
By admin | Published: February 21, 2015 03:52 AM2015-02-21T03:52:21+5:302015-02-21T03:52:21+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये पुढील आठवड्यात पीडीपी-भाजप युती सरकारची घोषणा होऊ शकते. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा काळजीपूर्वक तयार करण्यात आला
श्रीनगर/ नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पुढील आठवड्यात पीडीपी-भाजप युती सरकारची घोषणा होऊ शकते. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा काळजीपूर्वक तयार करण्यात आला असून त्यात कलम ३७० आणि सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्यासह सर्व वादग्रस्त मुद्यांवर तोडगा शोधण्यात आला आहे. रा.स्व. संघाने कलम ३७० हटविण्याची मागणी लावून धरल्याने अडसर निर्माण झाला होता, मात्र नव्याने कोणताही अडथळा आलेला नाही, असे भाजप सूत्रांनी स्पष्ट केले.
पीडीपीचे मुख्य आधारस्तंभ असलेले मुफ्ती मोहंमद सईद हे सहा वर्षांसाठी मुख्यमंत्री बनतील. त्यांनी राज्याशी संबंधित कोणत्याही मुद्यावर विकलो जाणार नाही असे सांगत पक्षाची भूमिका स्पष्ट केली; मात्र त्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सडेतोड आरोप केला आहे. अलीकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपची बाजू घेणारा पीडीपी हा पक्ष विकला गेला आहे. त्यामुळे ‘डिअर मुफ्तीसाहेब’ तुम्ही विकलो जाणार नाही अशी भाषा करू नका, असे ओमर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.
जम्मू-काश्मीरच्या ८७ सदस्यीय विधानसभेत पीडीपीकडे २८, तर भाजपकडे २५ आमदार आहेत. २३ डिसेंबर रोजी त्रिशंकू विधानसभेचा कौल मिळाल्यानंतर गेल्या सात आठवड्यांपासून या राज्यात राज्यपाल राजवट असून सरकार स्थापनेचा तिढा सुटू शकलेला नाही.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा कोणत्या ठिकाणी मागे घेतला जाऊ शकतो याबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. कलम ३७० बाबत पीडीपीने मागितलेले लेखी आश्वासन भाजपने दिलेले नाही. प. पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांची २५ हजार कुटुंबे भारतात वास्तव्याला असून त्याबाबत मानवतावादी विचार केला जावा, असे पीडीपीला वाटते.
संभाव्य खातेवाटप
पीडीपी- गृह, अर्थ आणि अन्य काही महत्त्वाची खाती.
भाजप- पर्यटन, जलसंसाधन, सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी आणि नियोजन.