काश्मीर: 'इसिस'च्या प्रभावाखालील ९ अल्पवयीन मुलांची सुधारगृहात रवानगी
By Admin | Published: December 25, 2015 10:01 AM2015-12-25T10:01:01+5:302015-12-25T10:23:00+5:30
कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'च्या प्रभावाखाली असलेल्या जम्मू-काश्मीरमधील ९ अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'च्या प्रभावाखाली असलेल्या जम्मू-काश्मीरमधील ९ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ ते १७ वयोगटातील या मुलांवर पेट्रोल बॉम्ब व दगड फेकल्याबद्दल तसेच राज्यात इसिसचे झेंडे फडकावल्याचा आरोप असून त्याच्याविरुद्ध 'बेकायदेशीर कृत्य' केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुलांपैकी तिघे जण शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी सीमा पार करून पाकिस्तामध्ये जाण्याची योजना आखत होते, अशी माहितीही हाती लागली आहे. १५ ते १७ वयोगटातील ही मुलं एका वॉट्सअॅप ग्रुपवरून एका उत्तर आफ्रिकी तरूणाच्या संपर्कात आली व प्रभावित झाली. 'अल-हयात' नावाच्या या व्हॉट्सअॅप ग्रुपचा नेता अबू बक्र या नावाने ओळखला जात असून या ग्रुपमध्ये अनेक विदेशी नागरिक सामील होते, अशी माहिती समोर आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेली ही मुले काश्मीरमध्ये अनेकवेळा इसिसचा झेंडा फडकावताना दिसली होती. त्यानंतर राज्य सरकार व पोलिस सतर्क झाले. मात्र सुरक्षा यंत्रणांनी ही मुलं इसिसच्या प्रभावाखाली आल्याचे व त्यासंबंधीत अशा कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.