बर्फवृष्टीने काश्मिरात जनजीवन विस्कळीत
By Admin | Published: January 7, 2017 04:48 AM2017-01-07T04:48:08+5:302017-01-07T04:48:08+5:30
काश्मिरात सलग चौथ्या दिवशी, शुक्रवारीही बर्फवृष्टीमुळे झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले
श्रीनगर/ चंदीगड : काश्मिरात सलग चौथ्या दिवशी, शुक्रवारीही बर्फवृष्टीमुळे झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करावा लागला आणि हवाई वाहतूक ठप्प होऊन खोऱ्याचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. खोऱ्यात आगामी दोन दिवस मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी किंवा पाऊस होण्याची शक्यता आहे. श्रीनगरकडे येत असलेली वाहने अवंतीपोरा, अनंतनाग आणि काजीगुुंड येथे, तर जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना नगरोटा येथे थांबविण्यात आले आहे. महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यास बर्फवृष्टीमुळे अडथळा येत आहे.
खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू असल्यामुळे काश्मीर विद्यापीठाने शनिवारी आणि रविवारी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली. काश्मीर विद्यापीठाच्या ७ आणि ८ तारखेच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, असे विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले.
काश्मीर व हिमाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांत आगामी २४ तासांत हिमस्खलन होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी धोका असणाऱ्या क्षेत्रात जाऊ नये, असा इशारा शुक्रवारी देण्यात आला. बर्फवृष्टी आणि हिमस्खलन अभ्यास केंद्राने जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा, किश्तवाड, राजौरी, डोडा, पूंछ आणि रियासी जिल्ह्यात आगामी २४ तासांत हिमस्खलन होण्याचा इशारा दिला आहे. (वृत्तसंस्था)
>पंजाब, हरियाणात धुके
धुक्यामुळे पंजाब, हरियाणातील हवाई, रेल्वे आणि रस्ता वाहतूक शुक्रवारी विस्कळीत झाली. या भागातील किमान तापमान सामान्य पातळीहून अधिक होते. तथापि, दाट धुके पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.