Jammu and Kashmir : ...तर जनावरांसारखे का बंद केले?, सना मुफ्तीचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:31 PM2019-08-06T15:31:45+5:302019-08-06T15:34:37+5:30
सना मुफ्तीने कलम 370 हटविण्याला विरोध दर्शविला आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी सना मुफ्तीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बीबीसी हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, सना मुफ्तीने कलम 370 हटविण्याला विरोध केला आहे. तसेच, या निर्णयामुळे काश्मीरमधील युवकांना फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे, कारण केंद्र सरकारने धोका दिला आहे, असे सनाने सांगितले. याचबरोबर, अमरनाथ यात्रेकरुंना माघारी परत जाण्यास सांगताना दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली. सरकार आमच्याशी खोटे बोलले आहे. आम्हाला राग व्यक्त करण्यास परवानगी दिली जात नाही. किती दिवस लोकांना घरात बंद करणार? जर हा निर्णय काश्मीर लोकांच्या भवितव्यासाठी आहे, तर त्यांना जनावरांसारखे बंद का केले आहे, असा सवाल सना मुफ्तीने केला आहे.
दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांनी काल कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली. 'आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. कलम 370 हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे' असे ट्वीट मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. तसेच भारताने काश्मीरबद्दल दिलेला शब्द पाळला नाही. काश्मीरच्या जनतेला दहशतीखाली ठेवून भारताला हा प्रदेश हवा आहे, असेही मुफ्ती यांनी म्हटले आहे.