काश्मीरमध्ये पोलिसाला जमावाने ठेचून ठार मारले
By admin | Published: June 24, 2017 04:33 AM2017-06-24T04:33:38+5:302017-06-24T04:33:38+5:30
गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी
श्रीनगर : गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी शुक्रवारी कळस गाठला. मशिदीबाहेर सुरक्षेसाठी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यालाच जमावाने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना श्रीनगर शहरात घडली. या घटनेने संतापाची लाट उमटली असून, या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद आयुब पंडित असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. श्रीनगरमधील नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर ते बंदोबस्तासाठी होते. ते अनेक काळापासून तिथे बंदोबस्तासाठी असल्याने मशिदीत नियमित जाणारे त्यांना ओळखत असत. त्या भागातील पोलीस नेहमीच साध्या वेशात असतात. गुरुवारी रात्री जामिया मशिदीमध्ये ‘शब-ए-कद्र’ची प्रार्थना सुरू होती. त्यासाठी तिथे शेकडो लोक जमले होते. त्यातील काहींना पंडित यांच्याविषयी शंका आली व त्यांनी उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातून तणाव वाढत गेला. जमाव वाढत गेला आणि त्याला पांगवण्यासाठी पंडित यांनी गोळीबार केला. त्यात तीन जण जखमी झाले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी या अधिकाऱ्याचे कपडे काढले आणि त्यास मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र फुटिरवाद्यांनी माथी भडकवल्याने अशी घटना घडल्याचा संशय असून, फुटिरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता मिरवाइज हा तेव्हा मशिदीत होता अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मिरवाइजनेही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले की, ह्यजमावाने केलेल्या मारहाणीमध्ये पंडित यांचा मृत्यु झाला. जमावाने पोलीस चौकीही उद्ध्वस्त केली.ह्ण यात सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही वैद यांनी दिला.
नेमका हल्ला का झाला?
काहींच्या म्हणण्यानुसार नमाज सुरू असताना पंडित मशिदीचा फोटो काढत होते. त्यामुळे जमावाचा गैरसमज झाला आणि तो पंडित यांच्या अंगावर धावून आला. स्वसंरक्षणासाठी या अधिकाऱ्याने गोळीबार केला, ज्यात तीन जण जखमी झाले.
बंदोबस्त वाढविला
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकाराची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. भाकप तसेच जम्मू-काश्मीर काँग्रेसनेही घटनेचा निषेध केला आहे. या प्रकारानंतर संपूर्ण श्रीनगर शहरात आणि काश्मीर खोऱ्यात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
जवानांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका
ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. जर पोलिसांच्या संयमाचा हा परिणाम असेल, तर येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे असे किती दिवस चालणार आहे ? जर असेच चालू राहिले, तर जसे आधी पोलिसांची जीप पाहताच लोक पळ काढायचे, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. जवानांच्या सहनशक्तीचा असा अंत पाहू नका, असा इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला.