काश्मीर पोलीस हत्या प्रकरण, आणखी तिघांना अटक
By admin | Published: June 24, 2017 01:11 PM2017-06-24T13:11:48+5:302017-06-24T13:11:48+5:30
श्रीनगरमध्ये मशिदीबाहेर सुरक्षेसाठी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाने ठेचून मारुन हत्या केल्याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 24 - मशिदीबाहेर सुरक्षेसाठी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाने ठेचून मारुन हत्या केल्याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद आयुब पंडित असे हत्या करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असून श्रीनगरमधील नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर ते बंदोबस्तासाठी होते. यावेळी त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.
पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी सांगितले की, या प्रकरणी आम्ही 12 जणांची ओळख पटवली असून एकूण पाच जणांना अट केली आहे. याआधी शुक्रवारी दोन जणांना अटक करण्यात आली होती. पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले की, जमावाने केलेल्या मारहाणीमध्ये पंडित यांचा मृत्यू झाला. जमावाने पोलीस चौकीही उद्धवस्त केली. यात सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही वैद यांनी दिला.
मोहम्मद आयुब पंडित हे श्रीनगरमधील नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर ते बंदोबस्तासाठी होते. ते अनेक काळापासून तिथे बंदोबस्तासाठी असल्याने मशिदीत नियमित जाणारे त्यांना ओळखत असत. त्या भागातील पोलीस नेहमीच साध्या वेशात असतात. गुरुवारी रात्री जामिया मशिदीमध्ये ‘शब-ए-कद्र’ची प्रार्थना सुरू होती. त्यासाठी तिथे शेकडो लोक जमले होते. त्यातील काहींना पंडित यांच्याविषयी शंका आली व त्यांनी उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातून तणाव वाढत गेला.
जमाव वाढत गेला आणि त्याला पांगवण्यासाठी पंडित यांनी गोळीबार केला. त्यात तीन जण जखमी झाले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी या अधिकाऱ्याचे कपडे काढले आणि त्यास मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र फुटिरवाद्यांनी माथी भडकवल्याने अशी घटना घडल्याचा संशय असून, फुटिरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता मिरवाइज हा तेव्हा मशिदीत होता अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मिरवाइजनेही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
नेमका हल्ला का झाला?
काहींच्या म्हणण्यानुसार नमाज सुरू असताना पंडित मशिदीचा फोटो काढत होते. त्यामुळे जमावाचा गैरसमज झाला आणि तो पंडित यांच्या अंगावर धावून आला. स्वसंरक्षणासाठी या अधिकाऱ्याने गोळीबार केला, ज्यात तीन जण जखमी झाले.
बंदोबस्त वाढवला
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकाराची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. भाकप तसेच जम्मू-काश्मीर काँग्रेसनेही घटनेचा निषेध केला आहे. या प्रकारानंतर संपूर्ण श्रीनगर शहरात आणि काश्मीर खोऱ्यात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
जवानांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका
ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. जर पोलिसांच्या संयमाचा हा परिणाम असेल, तर येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे असे किती दिवस चालणार आहे ? जर असेच चालू राहिले, तर जसे आधी पोलिसांची जीप पाहताच लोक पळ काढायचे, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. जवानांच्या सहनशक्तीचा असा अंत पाहू नका, असा इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला.