काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारसोबत - थरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:29 AM2019-09-23T03:29:23+5:302019-09-23T03:29:43+5:30
३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील लोकशाही, माणुसकी धोक्यात आली आहे. या मुद्यांवर मात्र आम्ही सरकारला धारेवर धरू, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले.
पुणे : पाकिस्तानला जम्मू काश्मीरमधील एक इंचही जमीन मिळू देणार नाही. काश्मीरप्रश्नी आंतररराष्ट्रीय पातळीवर आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत. पण ३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील लोकशाही, माणुसकी धोक्यात आली आहे. या मुद्यांवर मात्र आम्ही सरकारला धारेवर धरू, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर थरूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्या पद्धतीने ३७० कलम हटविले ते चुकीचे होते. आम्ही कधीच म्हणालो नाही की संविधान बदल होऊ शकणार नाही. माणुसकीच्या दृष्टीकोनातून हे व्हायला हवे. पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने लोकशाही व माणुसकीच्या विरोधात कलम हटविले. त्या विरोधात आम्ही बोलणारच.
भाजपाचा हिंदी, हिंदुत्व आणि हिंदुस्थानचा नारा देशासाठी फायद्याचा नाही. ‘एक देश, एक भाषा’ ही कल्पना देशाच्या एकतेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना दक्षिण भारतातील लोकांनी स्वीकारले नाही. राष्ट्रभाषेला राष्ट्रवादाशी जोडले जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच त्रिभाषेच्या सुत्राचा आदर करायला हवा, अशा शब्दांत थरूर यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या भूमिकेवर काँग्रेस भवनमध्ये बोलताना टीका केली.