काश्मीर हादरले !
By admin | Published: February 21, 2016 01:29 AM2016-02-21T01:29:04+5:302016-02-21T01:29:04+5:30
श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पम्पोर परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ जवान शहीद आणि १
श्रीनगर : श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पम्पोर परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ जवान शहीद आणि १ नागरिक ठार झाला. तसेच १० जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला केल्यावर दहशतवादी जवळच्याच एका सरकारी इमारतीत घुसले असून, सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत धुमश्चक्री सुरू होती.
दहशतवाद्यांनी नागरिकांना वेठीस धरू नये म्हणून सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी श्रीनगर शहराच्या बाहेरील भागात असणाऱ्या पम्पोर येथील उद्योजकता विकास संस्थान (ईडीआय) इमारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. इमारतीतून नागरिकांना बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक राजेंद्र यांनी सांगितले. तेथून जवळच असलेल्या इमारतीत असलेल्या अनेक नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
दहशतवाद्यांनी इमारतीत घुसताना आम्हाला बाहेर निघून जाण्यास सांगितले; कारण त्यांचा नागरिकांना नुकसान पोहोचविण्याचा हेतू नव्हता, असा दावा या इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या एकाने
केला. भारतीय लष्कराच्या प्रतिष्ठित १५ कोरचे
मुख्यालय हल्ल्याच्या ठिकाणापासून अवघ्या १०
किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करणाऱ्या सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराच्या जवानांना पाठविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
दहशतवाद्यांची संख्या तीन ते पाच
- प्रत्यक्षदर्र्शींच्या मते दहशतवाद्यांची संख्या तीन ते पाच आहे. या हल्ल्यात एक नागरिकही जखमी झाला असून, सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.
घटनास्थळी सातत्याने गोळीबार केला जात
असून, सुरक्षा अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या इमारतीला वेढा घातला आहे.
अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून घटनास्थळी विजेची व्यवस्था केली आहे.