Kashmir: काश्मीर पाकिस्तानला द्यावे का ? स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये अजब प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:07 PM2022-06-22T12:07:22+5:302022-06-22T12:08:19+5:30
Kashmir Issue: मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एमपीपीएससी) पूर्व परीक्षेत काश्मीरबाबत विचारलेला वादग्रस्त प्रश्न व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
भोपाळ : मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एमपीपीएससी) पूर्व परीक्षेत काश्मीरबाबत विचारलेला वादग्रस्त प्रश्न व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काश्मीर पाकिस्तानला देण्याचा निर्णय भारताने घ्यावा का, असा प्रश्न रविवारच्या परीक्षेत विचारल्याचे समोर आले आहे. या वादग्रस्त प्रश्नावरून राजकीय गदारोळही सुरू झाला आहे.
१९ जून रोजी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा झाली. या परीक्षेत काश्मीर पाकिस्तानला देण्याचा निर्णय भारताने घ्यावा का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यात पर्याय म्हणून युक्तिवाद १ दिला होता की, होय, यामुळे भारताचे खूप पैसे वाचतील. युक्तिवाद २ होता- नाही, अशा निर्णयामुळे आणखी समान मागण्या होतील. या प्रश्नामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले होते.
नेटकरीही संतापले
या प्रश्नाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. काश्मीर देशाच्या अभिमान आहे. काश्मीर पाकच्या ताब्यात देण्याचा विचारही आक्षेपार्ह आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेता अजय यादव यांनी दिली. अन्य विरोधकही यामुळे संतप्त आहेत. नेटकरीही एमपीपीएससीच्या परीक्षेत विचारलेल्या अशा प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
प्रश्नपत्रिका तयार करणारे काळ्या यादीत
हा वादग्रस्त प्रश्न व्हायरल झाल्यानंतर गदारोळ झाला. वाढता वाद पाहून मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने प्रश्न आक्षेपार्ह असल्याचे मान्य करीत संबंधित प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या दोन व्यक्तींना नोटीस पाठवून काळ्या यादीत टाकले आहे. यासोबतच प्रश्न तयार करताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही. हे गैरवर्तनाच्या श्रेणीत येते, असेही नमूद केले. आयोगाच्या परीक्षा पद्धतीतून दोघांनाही कायमचे वगळण्यात आले आहे. दोन्ही व्यक्तींच्या विभागांना त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी पत्रदेखील लिहिण्यात आले आहे. मात्र, भरती परीक्षेतील गोपनीयतेचे कारण देत वादग्रस्त प्रश्नपत्रिकेचे सेटर्स आणि मॉडरेटर यांची नावे उघड करण्यात आली नाहीत.