काश्मिरात ३ अतिरेक्यांचा खात्मा,‘लष्कर’च्या एका दहशतवाद्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 06:19 AM2020-02-20T06:19:24+5:302020-02-20T06:20:38+5:30
मोहिमेदरम्यान अतिरेकी आणि सुरक्षादलादरम्यान चकमक उडाली
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने स्वयंघोषित कमांडरसह हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. या भागात अतिरेकी असल्याची खबर मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा सुरक्षादलाने त्राल भागाची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली होती.
मोहिमेदरम्यान अतिरेकी आणि सुरक्षादलादरम्यान चकमक उडाली. यात जहांगीर अहमद वनी, राजा उमर मकबूल आणि सदात अहमद ठोकर हे तीन अतिरेकी ठार झाले. हमद राजा ठार झाल्यानंतर जहांगीर अहमदने हिज्बुल मुजाहिदीनची सूत्रे हाती घेतली होती. चकमक घडलेल्या ठिकाणांहून दोन एके-रायफली, एक पिस्तूल आणि दोन बॉम्ब, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. मागच्या महिन्यापासून आतापर्यंत विविध ठिकाणच्या चकमकीत २३ दहशतवादांचा खात्मा करण्यात आला. दोन नागरिकांच्या हत्येसह वनी आणि मकबूल अनेक दहशतवादी गुन्ह्यात सामील होते. गोळीबार तसेच दुकाने व ट्रक जाळपोळीच्या घटनेतही ते सामील होते. यावर्षी जानेवारीपासून काश्मीरमध्ये आठ मोहिमांत १९ अतिरेकी ठार झाले आहे. यापैकी चौघे जम्मू भागातील मोहिमेत ठार झाले. २०२० मध्ये काश्मिरात सुरक्षादलाच्या दहा मोहिमा यशस्वी झाल्या.
‘लष्कर’च्या एका दहशतवाद्यास अटक
पोलिसांनी कुलगाम जिल्ह्यात लष्कर- ए- तैयबा या संघटनेच्या एका सक्रिय दहशतवाद्याला अटक केली. झुबैर अहमद गनै, असे त्याचे नाव आहे. चौकशीनुसार तो रसदपुरवठा, दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांना प्रवासासाठी मदत करण्यात सामील होता. त्याच्याकडून आक्षेपार्ह साहित्य, दारूगोळा, मोबाईल फोन, तसेच अतिरेक्यांची ने-आण करण्यासाठी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.