“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:57 IST2025-04-24T18:57:06+5:302025-04-24T18:57:52+5:30

Pahalgam Terror Attack: गोळीबार सुरू असतानाच सगळ्यांना घेऊन तिथून सुरक्षितपणे कसे बाहेर पडलो, याचा थरारक अनुभव गाइडने कथन केला.

kashmir tourist guide saved 11 people from pahalgam terror attack | “अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले

“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली. दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांच्या राजदूतांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि घडामोडींची सविस्तर माहिती दिली. भारताने पाकिस्तानवर काही निर्बंध लादल्यानंतर थयथयाट झालेल्या पाकनेही प्रत्युत्तर म्हणून काही निर्णय जाहीर केले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यातच एक गाइड ११ जणांसाठी अक्षरश: देवदूत ठरला. त्यावेळी नेमके काय घडले हे त्याने सांगितले.

या गाइडचे नाव नजाकत अहमद शाह आहे. त्यांनी सांगितले की, काही जण १७ तारखेला येथे फिरायला आले होते. हे सगळे पर्यटक छत्तीसगड येथून आले होते. यामध्ये ४ दाम्पत्ये होती आणि त्यांच्यासोबत ३ लहान मुले होती. जम्मू येथून त्यांना सोबत घेतले आणि काश्मीरला आणले. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग येथे ते सगळे फिरले. पहलगाम शेवटी ठेवण्यात आले होते. याचे कारण म्हणजे आम्हाला त्या सगळ्यांचा पाहुणचार करायचा होता. पाहुणचार करणे ही आम्हा काश्मीरवासीयांसाठी आनंदाची बाब असते. आम्ही आवर्जून पाहुणचार करतो. आम्ही रात्री पहलगामला पोहोचलो आणि सकाळी बैसरनला निघालो. येथे पोहोचल्यानंतर ती सगळी मंडळी तिथे थोड्यावेळ फिरली. तिथे मॅगी खाल्ली. त्यानंतर सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढले. कदाचित दुपारी दीड ते दोन वाजले असतील, घोडेवाल्यांनी आम्हाला उशीर होत आहे, असे सांगून तिथून निघायला सांगितले.

अचानक गोळीबार सुरू झाला, दोन लहान मुलांना उराशी कवटाळले

हे सगळे घडत असतानाच अचानक गोळीबार सुरू झाला. त्यापैकी एकाने मला याबाबत विचारले. परंतु, फटाके फोडत असतील, असे वाटले. पुन्हा एकदा गोळीबार झाला. तेव्हाही आम्हाला असेच वाटले. परंतु, त्यानंतर तेथे जमा असलेले हजारो पर्यटक जमिनीवर झोपल्याचे दिसले. क्षणार्धात नेमके काय झाले, याचा अंदाज आला. सोबत असलेल्या दोन लहान मुलांना उराशी कवटाळले आणि मीही जमिनीवर झोपलो. गोळीबाराचा आवाज थांबला, असे वाटताच लहान मुलांसह तेथे माझ्यासोबत आलेल्या सगळ्यांना घेऊन मी धावत सुटलो. आम्ही सगळे धावतच पहलगाम येथे परत आलो. त्यांच्यापैकी काही जण मागे राहिले. त्यांनाही सुखरूप परत हॉटेलवर घेऊन आलो आणि सगळे ११ जण सुरक्षित राहिले, असे या गाइडने सांगितले.

दरम्यान, यानंतर त्यांना श्रीनगरला पोहोचवले आणि पुन्हा माझ्या गावी परत आलो. अतिशय भीतीदायक वातावरण होते. मृत्यू समोर उभा होता. कधी काय होईल सांगता येत नसल्यामुळे मीही माझ्या दोन लहान मुलींशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेटवर्क नव्हते. तिथे त्या क्षणी असलेले सगळे जण अक्षरश: किंचाळत होते. सगळे जण घाबरले होते, असे या गाइटने सांगितले.

 

Web Title: kashmir tourist guide saved 11 people from pahalgam terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.