ट्रक वाहकाच्या मृत्यूने काश्मीर खोरे तापले
By Admin | Published: October 20, 2015 04:26 AM2015-10-20T04:26:59+5:302015-10-20T04:26:59+5:30
उधमपूरमधील पेट्रोल बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ट्रक वाहकावर सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेल्या या
- अंत्ययात्रेनंतर हिंसाचार
श्रीनगर : उधमपूरमधील पेट्रोल बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ट्रक वाहकावर सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ फुटीरवादी व काही संघटनांनी पुकारलेला बंद आणि अनेक ठिकाणी सुरक्षा जवान-निदर्शकांमध्ये उडालेल्या चकमकींमुळे काश्मीर खोरे ढवळून निघाले. बनिहाल येथून रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली तर जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.
जाहीद अहमद या ट्रक वाहकाच्या मृत्यूची वार्ता पसरताच रविवारपासून खोऱ्यात हिंसाचार उफाळून आला होता. त्यानंतर आठ पोलीस ठाण्यांत संचारबंदीसदृश निर्बंध लागू करून फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. सोमवारी जाहीदचा मृतदेह शासकीय विमानाने दिल्लीतून आणण्यात आला. अनंतनागच्या बातेनगू या त्याच्या गावी अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी एका तरुणाने पाकिस्तानी झेंडा झेंडाही फडकावला.
१७ आॅक्टोबरला काश्मीरकडे जात असलेल्या एका ट्रकवर गोमांस असल्याच्या संशयावरून पेट्रोल बॉम्बहल्ला करण्यात आला होता. ज्यात चालक व वाहक जखमी झाले होते. हल्ला करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांपैकी पाच आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचा वाहक जाहीद अहमद याचा रविवारी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.