काश्मिरात पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Published: September 16, 2016 12:55 AM2016-09-16T00:55:36+5:302016-09-16T00:55:36+5:30

उत्तर प्रदेशमध्ये सत्तारुढ समाजवादी पार्टीतील अंतर्गत कलह शिखरावर पोहोचला असतानाच काश्मिरातील सत्तारुढ पीडीपीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे

In the Kashmir Valley on the threshold of PDP | काश्मिरात पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर

काश्मिरात पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर

Next


शीलेश शर्मा : नवी दिल्ली
उत्तर प्रदेशमध्ये सत्तारुढ समाजवादी पार्टीतील अंतर्गत कलह शिखरावर पोहोचला असतानाच काश्मिरातील सत्तारुढ पीडीपीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीडीपीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक खासदार तारिक कर्रा यांनी गुरुवारी पीडीपी आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पीडीपीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.
‘मी एकटा नाही. माझ्यासोबत पक्षाचे इतर आमदार आणि नेतेही राजीनामा देतील,’ असे कर्रा यांनी लोकमतला सांगितले. १९९८ मध्ये पीडीपीची स्थापना झाली होती त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद, मुजफ्फर बेग, तारिक कर्रा आणि गुलाम हसन मीर हे पक्षाचे संस्थापक सदस्य होते.
गुलाम हसन मीर यांनी याआधीच पीडीपीचा राजीनामा दिला आहे. सईद यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. सध्या संस्थापकांपैकी केवळ मुजफ्फर बेग हेच पीडीपीत राहिलेले आहेत. जम्मू-काश्मिरात भाजपा आणि पीडीपीचे आघाडी सरकार स्थापन करण्याला कर्रा यांनी सुरुवातीपासूनच प्रखर विरोध केला होता. परंतु मुफ्ती यांच्यामुळे ते शांत होते. त्यांनी बंडखोरी केली नाही. परंतु मुफ्ती यांच्या निधनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारवर वर्चस्व गाजवित असल्याचे पाहून कर्रा यांनी पक्षाशी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष व लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
तथापि लोकसभा अध्यक्षांनी अद्याप कर्रा यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. परंतु पक्षाचे दोन तुकडे करायचेच, असा पक्का निर्धार कर्रा यांनी केलेला दिसतो. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्रा यांच्यासोबत तीन ते चार आमदार आपापला राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
या आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला तरी मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तूर्तास कसलाही धोका नाही. परंतु पीडीपीला जबर राजकीय हादरा मात्र अवश्य बसणार आहे. कर्रा हे खोऱ्यातील दिग्गज नेते आहेत. त्यांनी फारुख अब्दुल्ला यांनाही धूळ चारलेली आहे. कर्रा हे सध्या पक्षाच्या अन्य आमदारांच्या संपर्कात आहेत आणि पक्षाचे तुकडे झाले तर आपल्यासोबत बहुसंख्य आमदार असावेत, असा त्यांचा प्रयत्न आहे.
८७ सदस्यीय विधानसभेत पीडीपीचे २८ तर भाजपाचे २५ आमदार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सजवळ १५ आणि काँग्रेसजवळ १२ आमदार आहेत.

 

Web Title: In the Kashmir Valley on the threshold of PDP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.