काश्मीर खो-यात आज शाळा-कॉलेज बंद
By admin | Published: April 18, 2017 09:17 AM2017-04-18T09:17:35+5:302017-04-18T09:42:45+5:30
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात वाढणा-या अंशाततेमुळे प्रशासनाने मंगळवारी येथील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात हिंसाचार वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी पुलवामा येथील एका कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या पोलीस कारवाईला विरोध करणा-या विद्यार्थ्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास 60 हून अधिक शाळा तसेच कॉलेजचे विद्यार्थी जखमी झाले, जखमींमध्ये विद्यार्थिनींचाही समावेश आहे.
दोन दिवसांपासून वारंवार होणा-या या घटनांच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारनं मंगळवारी खो-यातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुलमावा येथे ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी पेलेट गन आणि अश्रुधुराचा वापर केला होता.
पुलवामा येथील गर्व्हमेंट कॉलेजमधील कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी विद्यार्थ्यांनी कुपवाडा ते सोपोर आणि श्रीनगर ते कुलगामपर्यंत आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर युनिर्व्हसिटी स्टुडन्ट्स युनियन (KUSU)नं सोमवारी आंदोलन छेडले होते. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील मंगळवारी सर्व शाळा, कॉलेज आणि युनिर्व्हसिटी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री अल्ताफ बुखारी यांनी दिली.
दरम्यान, पुलवामा कारवाईचा निषेध नोंदवत श्रीनगर येथे शेकडो आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याची तसेच भारताविरोधी नारेबाजी करत मुख्य एम.ए.रोड बंद केला होता. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यात 7 विद्यार्थी आणि एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आम्ही शांततापूर्ण मार्गानंच आंदोलन करत असल्याचा दावा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
शनिवारी दक्षिणी काश्मीर येथील पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत 50 विद्यार्थी जखमी झाले होते. यावर शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल हमीद शेख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी पोलिसांनी शाळेच्या आत न येण्याची विनंती केली होती. मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.
यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आणि सुरक्षा रक्षकांकडून अश्रुधुराचा वापर करत कारवाई करण्यात आली. ज्यात विद्यार्थी जखमी झाले.
तर दुसरीकडे पोलिसांनी सांगितले की, शाळेपासून 200 मीटर अंतरावर नाका बंद ठेवला होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली.