"काश्मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा, अन्यथा...,"यूपी"मध्ये बॅनरबाजी
By admin | Published: April 21, 2017 04:44 PM2017-04-21T16:44:22+5:302017-04-21T16:44:22+5:30
काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर दगडफेकीचा उद्रेक उत्तर प्रदेशमध्ये उफाळून आला आहे
ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. 21 - काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर दगडफेकीचा उद्रेक उत्तर प्रदेशमध्ये उफाळून आला आहे. काश्मिरात जवानांवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध एका संघटनेने उत्तर प्रदेशमधल्या काश्मिरी नागरिकांना उत्तर प्रदेश सोडण्याचा इशारा दिला आहे. "काश्मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा. अन्यथा.." परिणाम भोगा, असा संदेश लिहिलेले बॅनर मेरठमध्ये लावण्यात आले आहेत.
"भारतीय लष्कराच्या जवानांवर दगडफेक करणा-या काश्मिरींचा बहिष्कार. काश्मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा. अन्यथा..", असा हिंदी भाषेत लिहिलेले पोस्टर झळकावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने हे बॅनर लावले असून, बॅनरवर काश्मीरमध्ये दगडफेक होत असतानाचे छायाचित्र आणि बॅनर लावणाऱ्या संघटनेचा अध्यक्ष अमित जानीचेही छायाचित्र दिसत आहे. दिल्ली-डेहराडून हायवेवरील एका कॉलेजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत.
काश्मिरी लोक शिक्षण आणि नोकरी भारतात करतात. मात्र ते फुटीरतावाद्यांना पाठिंबा देतात. त्यामुळेच आम्ही उत्तर प्रदेशमधून काश्मिरी लोकांचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना दूध, पाणी, वर्तमानपत्र, राहण्यासाठी भाड्यानं घरं आणि प्रवेश मिळू न देण्यासाठी जनजागृती अभियानही राबवणार आहोत. तसेच लोकांना जम्मू-काश्मीर बँकेतील त्यांची खाती बंद करण्यासही सांगणार आहोत. जर काश्मिरींनी उत्तर प्रदेश सोडलं नाही, तर आम्ही 30 एप्रिलला त्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून, असंही अमित जानी म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही काश्मिरींकडून होणा-या दगडफेकीवर चिंता व्यक्त करत काश्मिरींशी दुजाभाव न करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले होते. काश्मिरी तरुणांसोबत होणा-या दुजाभावाच्या प्रकाराचा मी निषेध करतो. काश्मिरी तरुणांना अयोग्य वागणूक देणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. उत्तर प्रदेशमधील सर्व तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी काश्मिरी तरुणांना स्वतःचे बंधू समजावे. देशातील कोणत्याही भागात कोणत्याही काश्मिरी तरुणांना मारहाण केली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना करतो. काश्मीरमधील अनेक लोक देशाची सुरक्षितता आणि समृद्धीसाठी योगदान देत आहेत, हे कोणीही विसरू शकत नसल्याचं गृहमंत्री म्हणाले आहेत.