पाकचे राष्ट्रगीत गाणारे काश्मिरी क्रिकेटपटू अटकेत
By admin | Published: April 7, 2017 04:50 AM2017-04-07T04:50:20+5:302017-04-07T04:50:20+5:30
स्थानिक क्रिकेट सामन्याआधी पाकिस्तानची जर्सी परिधान करून पाकिस्तानी राष्ट्रगीत गाणाऱ्या क्रिकेटपटूंना पोलिसांनी अटक केली
श्रीनगर : स्थानिक क्रिकेट सामन्याआधी पाकिस्तानची जर्सी परिधान करून पाकिस्तानी राष्ट्रगीत गाणाऱ्या क्रिकेटपटूंना पोलिसांनी अटक केली आहे. क्लब स्तरावरील क्रिकेट सामन्यात स्थानिक क्रिकेटपटूंनी हे कृत्य केले. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर हे सर्व क्रिकेटपटू फरार झाल्याचे सांगण्यात येत होते. काश्मीरच्या गंदरबल येथील वाइल मैदानात २ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. त्या वेळी फुटीरतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याविरोधात बंदचे आवाहन केले होते.
पंतप्रधान मोदी यांनी त्याच दिवशी चेनानी-नाशेरी बोगद्याच्या उद्घाटन केले होते. काश्मिरी खेळाडू पाकिस्तानी जर्सी घालून पाकचे राष्ट्रगीत म्हणत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली.
बाबा दरयाउद्दिन असे या खेळाडूंच्या टीमचे नाव आहे. आपण वेगळेपण दिसावे व आम्ही काश्मीरचा मुद्दा विसरलेलो नाही याची जाणीव लोकांना करून द्यावी, यासाठी ही थीम आम्ही निवडली, असे टीमच्या एका सदस्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
>हे नेहमीचेच
काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे अनेकदा फडकावले जातात. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा जवानांवर दगडफेक करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.