काश्मिरी कन्या बनली पायलट, काश्मीर खोऱ्यातील पहिली महिला वैमानिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 07:18 AM2018-09-01T07:18:03+5:302018-09-01T07:21:15+5:30
प्रेरणादायी कहाणी : इरम हबीबचे स्वप्न पूर्ण; पुढील महिन्यात होणार कामावर रुजू
नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात जन्मलेली आणि तिथेच वाढलेली इरम हबीब ही ३0 वर्षांची तरुणी आता वैमानिक झाली आहे. वैमानिक होणारी ती काश्मीर खोऱ्यातील पहिली मुस्लीम तरुणी आहे. तिथे वैमानिकाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, ती पुढील महिन्यात एका खासगी कंपनीत रुजू होईल.
इरमने लहानपणीच वैमानिक व्हायचे ठरवले होते. पण घरच्या मंडळींची त्यास तयारी नव्हती. घरच्यांना समजावण्यात माझी ६ वर्षे गेली. त्यानंतर मला आई-वडिलांनी परवानगी दिली, असे ती सांगते. तिचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण डेहराडूनमध्ये झाले आहे. घरचे लोक रुढी, परंपरा जपणारे असले तरी आर्थिक स्थिती चांगली असल्याने तिला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सारी मदत केली.
व्यावसायिक उड्डाणाचा परवाना मिळवण्यासाठी तिने दिल्लीत प्रशिक्षण घेतले. त्याआधी अमेरिकेतील मियामीमध्येही तिथे विमान उड्डाणाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. इरम हबीबचे वडील काश्मीरमधील आरोग्यविषयक सामग्री पुरवठा करणारे कंत्राटदार आहेत. वैद्यकीय सामग्रीचे पुरवठादार आहेत. दिल्लीतच नव्हे, तर मियामीमध्येही काश्मीरमधील मुस्लीम तरुणी विमान उड्डाण करते, हे पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली होती, पण आता माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे इरम हबीब सांगते.
या दोघीही पहिल्याच
याआधी जम्मूमधील काश्मिरी पंडित कुटुंबातील तन्वी रैना २0१६ साली एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून काम करू लागली. काश्मीर खोºयातील पहिली प्रशिक्षणार्थी वैमानिक आहे आयेशा अझिझ. तिथे २0१७ साली पहिले विमान उड्डाण केले होते.