काश्मीरप्रशी काँग्रेस बोलतेय पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 05:35 PM2017-10-29T17:35:29+5:302017-10-29T17:44:26+5:30
काश्मीरप्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती आरोप केला आहे. काश्मीरप्रश्नी काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांचे बोल काश्मीरसाठी स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांसारखे आहेत.
बंगळुरू - काश्मीरप्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती आरोप केला आहे. काश्मीरप्रश्नी काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांचे बोल काश्मीरसाठी स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांसारखे आहेत. हा आमच्या देशातील जवानांचा अपमान आहे. असा टोला काँग्रेसला लगावला आहे.
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी काश्मीर प्रश्नावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला ठिणगी पडली आहे. त्याचा धागा पकडत मोदींनी चिदंबरम यांचे नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. "काँग्रेस्च्या एका ज्येष्ठ नेत्यांनी काल केलेले वक्तव्य त्यांचा पक्ष सैनिकांचे शौर्य आणि सर्जिकल स्ट्राइकबाबत काय विचार करतो हे दाखवणारे आहे. काश्मीरच्या भूमीवर फुटीरतावादी आणि पाकिस्तानमध्ये जी भाषा बोलली जाते, तीच भाषा काँग्रेसचे नेते करत आहेत. जे कालपर्यंत सत्तेत बसले होते. ते अचानक यू टर्न घेत आहेत. त्यांना अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा खेद वाटत नाहीये."असे मोदी म्हणाले.
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी वित्तमंत्री असलेल्या चिदंबरम यांनी काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी केली होती. शनिवारी गुजरातमधील राजकोटमध्ये एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान केले होतं. जम्मू-काश्मीरच्या लोकांशी संवाद साधल्यानंतर मला असं जाणवलं की, जेव्हा ते स्वातंत्र्याची मागणी करतात तेव्हा खरं तर तेथील लोकांना स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता हवी आहे, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसने हात झटकले आहेत. एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक मत म्हणजे पक्षाची भूमिका होत नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं. चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला आणखी स्वायत्तता देण्याची मागणी केली होती. त्याचा भाजपानं निषेध नोंदवला आहे. जम्मू-काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग आहे आणि ते कायम राहील. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत हे काँग्रेसचंही मत असल्याचं मानणं योग्य ठरणार नाही, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत.