"हिंमत असेल तर..."; वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मुलीने दिलं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:59 PM2021-10-06T17:59:18+5:302021-10-06T18:12:22+5:30
Kashmiri pandit makhanlal bindroo daughter shraddha bindroo : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली.
नवी दिल्ली - श्रीनगरचे प्रमुख फार्मासिस्ट माखनलाल बिंद्रू यांची मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर त्यांची मुलगी श्रद्धा बिंद्रूने वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्यांना थेट खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली. बिंद्रू यांची श्रीनगरमधील त्यांच्या बिंद्रू मेडीकेट या दुकानात हत्या करण्यात आली. श्रद्धा बिंद्रू यांनी "तुम्ही एका व्यक्तीला मारू शकता, परंतु तुम्ही माखनलाल यांच्या आत्म्याला मारू शकत नाही" असं देखील म्हटलं आहे.
श्रद्धा बिंद्रू यांनी "माझे वडील जरी मरण पावले असतील, पण त्यांचा आत्मा सदैव जिवंत राहील. तुम्ही एका व्यक्तीला मारू शकता, परंतु तुम्ही माखनलाल यांच्या आत्म्याला मारू शकत नाही. ज्याने माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या, त्याने माझ्या समोर यावं. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिले, तर राजकारण्यांनी तुमच्या हातात बंदुका आणि दगड दिले. तुम्हाला बंदुका आणि दगडांनी लढायचे आहे? हा भ्याडपणा आहे. सर्व राजकारणी तुमचा वापर करत आहेत, या आणि शिक्षणाने लढा द्या" असं म्हटलं आहे.
#WATCH He was an awesome person who served Kashmir&Kashmiriyat. His body is gone but his spirit is still alive. Person responsible for the crime has opened doors of hell for himself:Shraddha Bindroo, daughter of pharmacist ML Bindroo who was killed by terrorists in Srinagar y'day pic.twitter.com/FEjNcDpVr2
— ANI (@ANI) October 6, 2021
"तुम्ही फक्त दगड फेकू शकता आणि मागून गोळ्या घालू शकता"
"ज्यांनी काम करताना माझ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्याशी समोरासमोर येऊन वाद घाला. मग तुम्ही कोण आहात हे आम्ही पाहू. पण तुम्ही हे करणार नाही. कारण तुम्ही एक शब्द बोलण्यासाठीही सक्षम नाही. तुम्ही फक्त दगड फेकू शकता आणि मागून गोळ्या घालू शकता" असं देखील श्रद्धा यांनी म्हटलं आहे. तसेच "मी एक सहाय्यक प्राध्यापक आहे. मी शून्यापासून सुरुवात केली. माझ्या वडिलांनी सायकलवरून कामाला सुरुवात केली."
"माझे वडील एक काश्मिरी पंडित होते, ते कधीही मरणार नाहीत"
"माझा भाऊ एक प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आहे, माझी आई मेडिकलमध्ये बसते. आम्ही आज जे आहोत ते आम्हाला माखनलाल बिंद्रू यांनी बनवले. माझे वडील एक काश्मिरी पंडित होते, ते कधीही मरणार नाहीत. हिंदू असूनही मी कुराण वाचले आहे. कुराण म्हणते की तुम्ही शरीराला मारू शकता, आत्मा जिवंत राहू शकतो. माखनलाल बिंद्रू आत्म्याने कायम जिवंत राहतील" असं देखील श्रद्धा बिंद्रू यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.