परिस्थिती नियंत्रणाबाहेर? १८०० काश्मिरी पंडितांचे स्थलांतर; ३ हजार कर्मचारी जम्मूत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 08:17 AM2022-06-03T08:17:18+5:302022-06-03T11:39:43+5:30

टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांमुळे काश्मिरी पंडित भयभीत झाले असून, आता सामूहिक स्थलांतराच्या तयारीत आहेत.

kashmiri pandits decide to collectively migrate to jammu so far more than 3 thousand have left valley | परिस्थिती नियंत्रणाबाहेर? १८०० काश्मिरी पंडितांचे स्थलांतर; ३ हजार कर्मचारी जम्मूत दाखल

परिस्थिती नियंत्रणाबाहेर? १८०० काश्मिरी पंडितांचे स्थलांतर; ३ हजार कर्मचारी जम्मूत दाखल

googlenewsNext

जम्मू: दक्षिण काश्मीर भागातील कुलगाम जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत दोन काश्मिरी पंडितांच्या झालेल्या हत्यांमुळे जम्मू-काश्मीर हादरून गेले आहे. याचा परिणाम म्हणून काश्मिरी पंडितांनी सामूहिकरित्या खोरे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी १८०० काश्मिरी पंडितांनी जम्मू खोऱ्यातून स्थलांतर केले असून, सुमारे ३ हजार सरकारी तसेच अन्य कर्मचारी जम्मूत दाखल झाले आहेत. श्रीनगरच्या अनेक भागात काश्मिरी पंडितांची निवासस्थाने तसेच संबंधित परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तसेच निमलष्करी पथकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्यांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर पुन्हा एकदा जम्मू खोऱ्यात तणावाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये स्थानिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत एनएसए अजित डोवालही उपस्थित राहणार आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालल्याचे बोलले जात आहे. 

खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्याची घोषणा

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे तिथे राहणारे हिंदू भयभीत झाले असून, आता सामूहिक स्थलांतराच्या तयारीत आहेत. गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँकेत घुसून व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांनंतर आता काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काश्मिरी पंडितांनी ठरवले आहे की, ज्या भागात काश्मिरी पंडित आंदोलन करत होते, ते त्वरित बंद करण्यात येईल. काश्मीरमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांकांसमोर आता दुसरा पर्याय उरला नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत सर्व लोकांना बनिहालच्या नवयुग बोगद्याजवळ एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग येथील सुरक्षा शिबिरात राहणारे आंदोलक रंजन झुत्शी म्हणाले की, गेल्या २२ दिवसांपासून सर्वजण आंदोलन करत आहेत. आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढावे, अशी आमची मागणी आहे. विजय कुमार आणि रजनी बाला यांची निर्घृण हत्या झाली. ज्या दिवशी राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्या दिवशी आम्ही सांगितले होते की, आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढा. जसे आम्ही १९९० मध्ये स्थलांतरित झालो होतो, त्याप्रकारे आताही जावे लागत आहे. सुमारे ३००० कर्मचारी आधीच जम्मूमध्ये पोहोचले आहेत. 
 

Web Title: kashmiri pandits decide to collectively migrate to jammu so far more than 3 thousand have left valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.