"आता पर्यायच उरला नाही", काश्मिरी पंडितांवर पुन्हा नामुष्की?, 'टार्गेट किलिंग'मुळे भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:28 PM2022-06-02T15:28:34+5:302022-06-02T15:29:18+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून 'टार्गेट किलिंग'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून 'टार्गेट किलिंग'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे. काश्मीर सोडून जाण्याशिवाय आमच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही, असं काश्मिरी पंडितांनी म्हटलं आहे. गेल्या दिवसांमध्ये दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडित, हिंदू आणि परराज्यातील नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. याशिवाय काही स्थानिक नागरिकांवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी बडगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची त्यांच्याच कार्यालयात जाऊन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर काश्मिरी पंडितांनी या घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं देखील केली होती.
काश्मीर खोरं पूर्वीपेक्षा खूप शांत झाल्यानं अनेक काश्मिरी पंडित कुटुंब पुन्हा काश्मीर खोऱ्यात स्थायिक झाले होते. पण आता पुन्हा एकदा या भागात काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. यामुळे या समुदायामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच मु्द्द्यावरुन काश्मिरी पंडितांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. दुसरीकडे सातत्यानं काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात असल्यामुळे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येण्याबाबतही चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली होती.
कुलगाममध्ये बँक कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्या
कुलगाममध्ये आज दहशतवाद्यांनी बँक परिसरात एका बँक कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या. यात बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती मूळचा राजस्थानचा असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यात १ मे पासून तिसऱ्यांदा एका बिगर मुस्लिम व्यक्तीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. तर गेल्या महिन्याभरात टार्गेट किलिंगचं हे आठवं प्रकरण आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय कुमार हे दक्षिण काश्मीर जिल्ह्यात एका बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होते. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर गंभररित्या जखमी झालेल्या विजय कुमार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.