कलम ३७० विरोधात काश्मिरी पक्षांनी उघडली आघाडी, बैठकीनंतर फारुख अब्दुल्लांनी केले मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 08:15 PM2020-10-15T20:15:12+5:302020-10-15T20:23:26+5:30
Jammu Kashmir News : पीडीपीच्या नेत्या महेबुबा मुफ्ती यांची नजरकैदेतून मुक्तता झाल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे.
श्रीनगर - पीडीपीच्या नेत्या महेबुबा मुफ्ती यांची नजरकैदेतून मुक्तता झाल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. आज श्रीनगरमधील निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले की, आम्ही या आघाडीचे नामकरण पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन असे ठेवले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेचे ते सर्व अधिकार परत देण्यात यावेत जे त्यांच्याकडे ऑगस्ट २०१९ पूर्वी होते.
दरम्यान, आम्ही काही दिवसांनंतर पुन्हा एकदा भेटणार असून, त्यामध्ये पुढील रणनीती जाहीर केली जाईल, असेही अब्दुल्ला यांनी पुढे सांगितले. आज झालेल्या या बैठकीला नॅशनल कॉन्फ्रन्सचे उपाध्यक्ष औमर अब्दुल्ला आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती उपस्थित होत्या.
Jammu & Kashmir: All-party meeting underway at National Conference (NC) president Farooq Abdullah's residence in Srinagar. pic.twitter.com/4ljwqbbXdw
— ANI (@ANI) October 15, 2020
यापूर्वी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या गुरुवारी नॅशनल कॉन्फ्रसचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या घरी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीसाठी आल्या होत्या. त्यांनी फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चा केली होती.
काय आहे गुपकार घोषणा
चार ऑगस्ट २०१९ रोजी फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला महेबूबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फ्रन्सचे सज्जाद गनी लोन, अवामी नॅशनल कॉन्फ्रन्सचे मुझफ्फर शाह, काँग्रेस नेते जीए मीर आणि अन्य लहान पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत भाजपा सहभागी झाली नव्हती. जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाशी फेरफार करण्यात येऊ नये, अशी मागणी या घोषणापत्रामधून करण्यात आली होती. त्यावर उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या सह्या होत्या. यालाच गुपकार घोषणा म्हणतात.