काश्मिरी लोकांना दहशतवादी आणि सैनिक दोघंही मारतात- दिग्विजय सिंह
By admin | Published: April 16, 2017 12:20 PM2017-04-16T12:20:40+5:302017-04-16T12:20:40+5:30
काश्मिरमध्ये सैन्य आणि स्थानिक नागरिकांमधील वाद वाढत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - काश्मिरमध्ये सैन्य आणि स्थानिक नागरिकांमधील वाद वाढत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काश्मिरी जनतेला सैन्य आणि दहशतवादी दोघेही मारतात असं ते म्हणाले आहेत. दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि स्थानिक लोकांमधील वाद चिघळत आहे. त्यासंबंधी काही व्हिडीओही सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी लाथा-बुक्यांनी मारल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होत होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी एका व्हिडिओत लष्कराच्या जीपवर हातपाय बांधलेल्या एका काश्मीरी युवकाचा व्हिडिओ समोर आला. अशापरिस्थितीत दिग्विजय सिंह यांनी केलेलं ‘काश्मिरी लोकांना एका बाजूने दहशतवादी मारतात तर दुसरीकडून भारतीय लष्कराचे जवान.’ हे वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी, पाकिस्तान अधिकृत काश्मिरबाबत पंतप्रधान मोदींना जास्त काळजी वाटते, पण काश्मिरमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे असं ते म्हणाले होते.