काश्मिरी सैनिकास मरणोत्तर अशोक चक्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 05:57 AM2019-01-25T05:57:42+5:302019-01-25T05:57:48+5:30

प्राणाहुती दिलेल्या भारतीय सैन्यातील लान्स नाईक नझीर अहमद वणी या बहाद्दर शिपायास अतुलनीय शौर्यासाठीच्या ‘अशोक चक्र’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात येईल.

Kashmiri Sainikas posthumous Ashok Chakra | काश्मिरी सैनिकास मरणोत्तर अशोक चक्र

काश्मिरी सैनिकास मरणोत्तर अशोक चक्र

googlenewsNext

नवी दिल्ली : गैरसमजाने पत्करलेला दहशतवादाचा मार्ग सोडून समाजात परत आलेल्या आणि नंतर लष्करात दाखल होऊन त्याच दहशतवादाचा पाडाव करण्यासाठी प्राणाहुती दिलेल्या भारतीय सैन्यातील लान्स नाईक नझीर अहमद वणी या बहाद्दर शिपायास अतुलनीय शौर्यासाठीच्या ‘अशोक चक्र’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात येईल.
लान्स नाईक वणी यांना गेल्या १५ नोव्हेंबर रोजी शोपियान येथे एका घरात दडून बसलेल्या सहा दहशतवाद्यांशी मुकाबला करताना हौतात्म्य आले होते. या चकमकीत समोरून बेछूट गोळीबार होत असूनही वणी यांनी त्या घरात घुसून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
३८ वर्षांचे लान्स नाईक वणी मूळचे कुलगाम जिल्ह्यातील अशमुजी येथील होते. तरुणपणी विखारी धार्मिक प्रचाराने प्रभावित होऊन ते दहशतवाद्यांमध्ये सामील झाले होते. मात्र, आपल्याच बांधवांविरुद्ध दहशतवादी मार्गाचा फोलपणा लक्षात आल्यावर ते परत फिरले.
>प्रजासत्ताकदिनी सन्मान
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काश्मीरच्या या शूरवीरास ‘अशोक चक्र’ने सन्मानित करण्यात येईल. शनिवारी राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात राष्टÑपती व तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च अधिकारी रामनाथ कोविंद लान्स नाईक वणी यांचा हा मरणोत्तर सन्मान त्यांच्या विधवा पत्नीस सुपूर्द करतील.

Web Title: Kashmiri Sainikas posthumous Ashok Chakra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.