फुटीरतावाद्यांची पोरे तुपाशी, सामान्य काश्मिरी उपाशी, आता सरकार जनतेसमोर आणणार वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 10:37 AM2019-07-04T10:37:04+5:302019-07-04T10:37:43+5:30
सर्वसामान्य काश्मिरी तरुणांच्या हाती दगडगोटे देणाऱे, दहशतवादी मारले गेल्यावर शाळा बंद करणारे फुटीरतावादी नेते आपल्या मुलांना मात्र परदेशात शिकवतात.
नवी दिल्ली - काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना आणि नेत्यांची गेल्या काही काळापासून केंद्र सरकारकडून सातत्याने कोंडी केली जात आहे. आता या काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांचा खरा चेहरा सर्वसामान्य काश्मिरी जनतेसमोर आणण्यासाठी अमित शहांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाने योजना आखली आहे. या योजनेनुसार सर्वसामान्य काश्मिरी तरुणांच्या हाती दगडगोटे देणाऱे, दहशतवादी मारले गेल्यावर शाळा बंद करणारे फुटीरतावादी नेते आपल्या मुलांना मात्र परदेशात शिकवतात. हुर्रियतचे नेते, खोऱ्यातील 112 फुटीरतावादी आणि त्यांचे सहानुभूतीदार यांची सुमारे 220 मुले विदेशात शिक्षण घेत आहेत किंवा वास्तव्य करत आहेत. सामान्य काश्मिरी जनतेला कुर्बानीचे आवाहन करणाऱ्या फुटीरतावाद्यांचा हा चेहरा काश्मीरमधील उच्च वर्गाला ठावूक आहे. आता फुटीरतावाद्यांचे हे वास्तव सर्वसामान्य काश्मिरी जनतेसमोर आणण्यासाठी गृहमंत्रलयाने योजना आखली असून, त्यातून फुटीरतावादी नेत्यांचा दुतोंडी चेहरा समोर आणला जाणार आहे.
फुटीरतावाद्यांविरोधातील या पोलखोल अभियानासाठीची पूर्वतयारी गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात सुरू केली आहे. त्यांनी हुर्रियतच्या 130 नेत्यांची सविस्तर माहिती संसदेत मांडली आहे. या फुटीरतावादी नेत्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले आहे, तसेच इथे मात्र ते सर्वसामान्य शालेय विद्यार्थ्यांना दगडफेक करायला लावतात, याचा उल्लेख त्यांनी या माहितीमध्ये केला आहे.
गृहमंत्रालयाती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तहरिक ए हुर्रियतचे प्रमुख अश्रफ सेहराई यांचे दोन मुलगे खालिद आणि आबिद अश्रफ सौदी अऱेबियामध्ये स्थायिक झाले आहेत. जमात ए इस्लामीचे प्रमुख गुलाम मुहम्मद बट यांचा एक मुलगा सौदी अरेबियात डॉक्टर आहे. दुख्तरान ए मिल्लत या संघटनेच्या नेत्या आसिया अंद्राबी यांचे दोन मुलगे परदेशात शिकत आहेत. तर सय्यद अली शहा गिलानी यांचा मुलगा नीलम गिलानी याने नुकतेच पाकिस्तानमध्ये एमबीबीएचचे शिक्षण पूर्ण केले आहे.
हुर्रियतचे नेते मीरवाइज उमर फारुख यांची एक बहीण राबिया फारुख अमेरिकेत डॉक्टर आहे. तर बिलाल लोन यांची मुलगी आणि जावई लंडनमध्ये स्थायिक झालेले आहेत. तर त्यांची एक मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत आहे. फुटीरतावादी नेते मोहम्मद शफी रेशी यांचा मुलगा अमेरिकेत पीएचडी करत आहे. तर अश्रफ लाया यांची मुलगी पाकिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. याशिवाय इतर अनेक फुटीरतावादी नेत्यांची मुलेही शिक्षण आणि नोकरी व्यवसायासाठी परदेशात स्थायिक झालेली आहेत.