काश्मिरी फुटीरतावाद्यांनी चर्चेचे निमंत्रण फेटाळले
By admin | Published: September 5, 2016 06:01 AM2016-09-05T06:01:33+5:302016-09-05T06:01:33+5:30
काश्मीर खोऱ्यात शांतता कशी प्रस्थापित करता येईल, यावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली रविवारी येथे दाखल झाले.
श्रीनगर : गले दोन महिने धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांतता कशी प्रस्थापित करता येईल, यावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली रविवारी येथे दाखल झाले.
राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते.
मात्र, चर्चा हा भारत सरकारचा कुटील डाव आहे व त्यातून काही साध्य होणार नाही, असे म्हणून त्यांनी हे निमंत्रण धुडकावून लावले. दुसरीकडे शोपियानमध्ये एका इमारतीस आग लावण्यासह काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या इतरही घटना सुरूच राहिल्या.
प्रस्तावित शिष्टमंडळात मुळात २९ सदस्य होते, पण प्रत्यक्षात त्यापैकी २६ सदस्यच दोन दिवसांसाठी येथे आले आहेत. सर्वप्रथम मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती आणि समूह यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, शिष्टमंडळ सर्वांचे म्हणणे ऐकून घेणार आहे आणि हा दौरा काश्मीरसोबत देशाच्याही हिताचा आहे. (वृत्तसंस्था)
>हिंसाचार, श्रीनगरमध्ये संचारबंदी
सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ काश्मिरात दाखल झालेले असताना, दुसरीकडे काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रविवारी सकाळी आंदोलकांनी मिनी सचिवालयाच्या इमारतीला आग लावली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शोपियाच्या पेनजुरा गावात आंदोलकांनी एक रॅली काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही रॅली रोखल्यानंतर संघर्ष झाला, तर श्रीनगरच्या काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात ५८ दिवसांपासून जनजीवन विस्कळीत आहे.
>चार खासदार हुर्रियत नेत्यांना भेटणार
सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळातील चार खासदार स्वतंंत्रपणे हुर्रियतच्या नेत्यांना भेटणार आहेत. माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे नेते डी. राजा, जदयूचे नेते शरद यादव आणि राजदचे जयप्रकाश नारायण हे चार जण हुर्रियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. गिलानी सध्या नजरकैदेत आहेत. अन्य फुटीरतावादी नेत्यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.