काश्मीरचा आत्मघाती हल्ला केला पोलिसाच्याच मुलाने! तीनपैकी दोन हल्लेखोर स्थानिक युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:39 AM2018-01-02T01:39:27+5:302018-01-02T01:41:17+5:30
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर रविवारी पहाटे आत्मघती हल्ला करणा-या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे काश्मीरमधील स्थानिक युवक होते, असे सोमवारी स्पष्ट झाले.
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर रविवारी पहाटे आत्मघती हल्ला करणा-या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे काश्मीरमधील स्थानिक युवक होते, असे सोमवारी स्पष्ट झाले. या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते व अन्य तिघे जखमी झाले होते.
हा तळ पिंजून काढून घुसलेल्या अतिरेक्यांचा शोध घेण्याचे काम सोमवारी दुपारी संपले. तिस-या हल्लेखोराचाही मृतदेह हाती लागला. पण त्याची ओळख लगेच पटू शकली नाही. शोध मोहिमेत हल्लेखोरांनी सोबत आणलेल्या तीन एके-४७ रायफली व आठ हातबॉम्ब सापडले.
रविवारी सुरक्षा दलांच्या जबाबी कारवाईत मारले गेलेले दोन्ही हल्लेखोर स्थानिक काश्मीरी युवक होते, असे स्पष्ट झाले. फरदीन अहमद खांडे आणि मन्सूर अहमद बाबा अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही तीन महिन्यांपूर्वीच घरातून निघून जाऊन दहशतवाद्यांना सामील झाले होते. यापैकी अवघ्या १७ वर्षांचा फरदीन काश्मीर पोलीस दलातील एका जमादाराचा मुलगा होता. मन्सूर बाबा १९ वर्षांचा होता. गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झालेला ‘जैश’चा चार फुटी ‘कमांडर’ नूर मोहम्मद तंतरे याने फरदीन व मन्सूर यांची डोकी भडकवून त्यांना दहशतवादी मार्गाला वळविले, असे मानले जाते. स्थानिक युवकांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेस यश आले असून भरकटलेल्या ७५ युवकांना परत आणण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. शिवाय सुरक्षा दलांच्या दमदार कारवाईने काश्मीर खोºयातील दहशतवाद्यांचे संपूर्ण नेतृत्व आता संपुष्टात आले आहे, अशी बढाईही जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक ए,पी. वैद यांनी मारली होती.
ताज्या हल्ल्याने या दाव्यांच्या फोलपणासोबत स्थानिक युवकांमधील खदखदही समोर आली आहे. सन २०१७ या सरत्या वर्षात ९५ स्थानिक अतिरेक्यांसह एकूण २०० अतिरेकी काश्मिरमध्ये मारले गेले. तर दहशतवादाच्या विविध घटनांमध्ये ३९१ नागरिक व सुरक्षा कर्मचाºयांना प्राण गमवावे लागले. (वृत्तसंस्था)
हे पाच जण झाले शहीद
निरीक्षक कुलदीप रॉय, जमादार तौफिक अहमद आणि सरीफुद्दीन गनाई, राजेंद्र जैन व प्रदीप कुमार पांडा हे शिपाई या आत्मघाती हल्ल्यात शहीद झाले. श्रीनगरजवळच्या सीआरपीएफच्या मुख्य तळावर वरिष्ठांच्या उपस्थितीत अखेरची सलामी देऊन त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आले.
अंत्यसंस्कारास अलोट गर्दी
त्रालचा हल्लेखोर फरदीन याच्या अंत्यसंस्कारावेळी हजारो लोक उपस्थित होते. गर्दी एवढी अलोट होती की, सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी ‘जनाजे की नमाज’ चार वेळा पढण्यात आली. अंत्यसंस्कारात दहशतवाद्यांनी सहभागी होऊ नये, यासाठी पोलीस व सुरक्षा दलांनी त्या परिसरास वेढा घातला होता.
जमावाने या वेळी इस्लामधार्जिण्या व ‘जिहाद’च्या घोषणा दिल्या. सुरक्षा दलांच्या कारवाईत दीड वर्षापूर्वी ज्याच्या मारले जाण्याने काश्मीर खो-यातील दहशतवादी कारवायांना पुन्हा जोर चढला, तो बु-हाण वणी याच त्राल गावातील होता.
हल्ल्यापूर्वीचा व्हिडीओ
फरदीन याचा हल्ल्यापूर्वी रेकॉर्ड केलेला आठ मिनिटांचा व्हिडीओ ‘जैश’ने जारी केला व तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यात फरदीन रायफली व काडतुसे समोर मांडून बसलेला दाखविला आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ला संपविणे अशक्य आहे, अशी वल्गना करत, फरदीन या व्हिडीओमध्ये स्थानिक युवकांना ‘जिहाद’मध्ये सामील होण्याचे आवाहन करतो. हा व्हिडीओ तुम्ही पाहाल, तोपर्यंत मी जन्नतमध्ये पोहोचलेला असेन, असेही फरदीन सांगत असल्याचे यात दिसते.