यूपी, राजस्थान सोडण्यासाठी काश्मिरी नागरिकांना धमक्या
By admin | Published: April 22, 2017 01:29 AM2017-04-22T01:29:24+5:302017-04-22T01:29:24+5:30
काश्मिरी नागरिकांनो, उत्तर प्रदेश सोडून जा, असे बॅनर मेरठमध्ये लागले असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मिरात सुरक्षा दलाच्या जवानांवर होत असलेल्या
मेरठ : काश्मिरी नागरिकांनो, उत्तर प्रदेश सोडून जा, असे बॅनर मेरठमध्ये लागले असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मिरात सुरक्षा दलाच्या जवानांवर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर असे बॅनर लागले आहेत. काश्मिरी नागरिकांवर बहिष्कार करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानी यांनी सांगितले की, काश्मिरींवर बहिष्काराबाबतचे बॅनर आणि होर्डिंग मेरठच्या परतापूर बायपासस्थित मार्गावर काही महाविद्यालयांच्या बाहेर लावले आहेत, जिथे काही काश्मिरी विद्यार्थी शिक्षण घेतात. अर्थात, हे पहिले पाऊल असून, त्यानंतरही काश्मिरी नागरिक येथून गेले नाहीत, तर हल्ला बोल करण्यात येईल. ३० एप्रिलपासून काश्मिरींना जबरदस्तीने येथून बाहेर काढण्यात येईल.
परतापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी दिनेश शर्मा यांनी सांगितले की, हे बॅनर हटविण्यात आले आहेत. उपनिरीक्षक विपिन कुमार यांनी सांगितले की, धर्म, जाती, जन्मस्थळ, भाषा या आधारे समुदायात मतभेद निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात दिसत होते की, काही तरुण सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करत आहेत. यावर देशभरातून टीका होत आहे. (वृत्तसंस्था)
चौथ्या दिवशीही महाविद्यालये बंद
श्रीनगर : संपूर्ण काश्मिरातील महाविद्यालये शुक्रवारी चौथ्या दिवशीही बंद होती. सुरक्षा दलाकडून बळाचा वापर होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे.
या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर, या शिक्षण संस्था बंद आहेत. विभागीय आयुक्त बशीर खान यांच्या आदेशानंतर ही महाविद्यालये सलग चौथ्या दिवशी बंद आहेत.