काश्मिरी तरुणच कारणीभूत!

By admin | Published: March 31, 2017 01:24 AM2017-03-31T01:24:40+5:302017-03-31T01:24:40+5:30

सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी जाणारे युवक एकाप्रकारे स्वत:च्या

Kashmiri youth causes! | काश्मिरी तरुणच कारणीभूत!

काश्मिरी तरुणच कारणीभूत!

Next

श्रीनगर : सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी जाणारे युवक एकाप्रकारे स्वत:च्या आत्महत्येला कारणीभूतच ठरत आहेत, त्यांनी या प्रकारापासून दूर राहावे, असे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी केले आहे.
चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस बुलेटप्रूफ वाहन किंवा घराचा आडोसा घेतात. अशा ठिकाणी युवकांनी जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे, असे सांगून ते म्हणाले की, राजकीय लाभासाठी खोऱ्यातील शांततेला बाधा पोहोचवू पाहणारे घटक दिशाभूल करून आपला वापर करीत आहेत हे युवकांनी समजून घेण्याची गरज आहे. आपण कोणाला लागू हे गोळीला माहीत नसते. त्यामुळे माझे सर्व तरुण मुलांना आवाहन आहे की, त्यांनी चकमकीच्या ठिकाणी न येता आपल्या घरातच थांबावे.
दहशतवाद्यांना पळून जाता यावे यासाठी तरुणांना दगडफेकीसाठी चिथावले जाते. यासाठी समाजकंटक सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. आमचा देश व खोऱ्यातील शांततेच्या शत्रूंकडून सोशल मीडियाचा होत असलेला हा दुरुपयोग आहे, असेही ते म्हणाले.
तरुणांना चिथावण्यासाठी हे लोक जवळपास ३०० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स सक्रिय करतात. हे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि सोशल साइट्स निगराणीखाली असून, संबंधितांवर कारवाई केली जाईल. यातील काही अकाउंट सीमेपलीकडील असल्याचे चौकशीत आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.

आयएसआयचा प्रयत्न
पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय काश्मीर खोऱ्यातील निरपराध तरुणांना घराबाहेर पडून चकमकीच्या ठिकाणी जाण्यासाठी चिथावत आहे, असेही वेद म्हणाले.
वेद यांनी मंगळवारच्या हिंसाचारानंतर पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांची भेट घेऊन काश्मिरातील विद्यमान परिस्थितीवर विस्ताराने चर्चा केली. खोऱ्यात कुठेही चकमक सुरू होताच. पाकिस्तानी गुप्तचर सक्रिय होतात, असेही ते म्हणाले.


केंद्र सरकारने चर्चेची प्रक्रिया सुरू करावी
काश्मिरातील परिस्थिती कठीण असून, केंद्राने सर्व पक्षकारांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करायला हवी, असे एका शीख संघटनेने गुरुवारी म्हटले. निदर्शकांवरील कठोर कारवाईमुळे युवक मुख्य प्रवाहापासून आणखी दुरावतील, असेही संघटनेने म्हटले आहे.
आॅल पार्टीज् शीख को-आॅर्डिनेशन समितीचे (एपीएससीसी) अध्यक्ष जगमोहनसिंग रैना म्हणाले की, काश्मिरात सध्या खूपच वाईट परिस्थिती आहे.
केंद्र सरकार परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व संबंधित पक्षकारांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करील, अशी आम्हाला आशा आहे. निदर्शकांवर कठोर कारवाईतून काहीही साध्य होणार नाही. उलट यामुळे तरुणवर्ग मुख्य प्रवाहापासून दुरावेल.

Web Title: Kashmiri youth causes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.