उपनिरीक्षकपदासाठी काश्मिरी तरुणाईची श्रीनगरमध्ये झुंबड
By admin | Published: May 15, 2017 12:10 AM2017-05-15T00:10:26+5:302017-05-15T00:10:26+5:30
विविध दहशतवादी संघटनांच्या धमकीची पर्वा न करता जम्मू-काश्मीर खोऱ्यातील तरुण सुरक्षा दलात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे ६९८ पोलीस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी
श्रीनगर : विविध दहशतवादी संघटनांच्या धमकीची पर्वा न करता जम्मू-काश्मीर खोऱ्यातील तरुण सुरक्षा दलात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे ६९८ पोलीस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसते. पोलीस उप-निरीक्षकपदासाठी ६७ हजार २१८ उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी जवळपास २ हजार तरुण आणि युवतींनी बक्षी स्टेडियमवर शारीरिक चाचणीसाठी हजेरी लावली होती.
भारतीय लष्करातील तरुण अधिकारी लेफ्ट. उमर फैयाज यांचे अपहरण करून हिजबूल मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी त्यांची हत्या करण्यात आल्याची संतप्त घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा देशभर निषेध करण्यात आला.
दुसरीकडे, दहशतवादी संघटनांना काश्मीरमधील तरुणांना सुरक्षा दलात सामील होऊ नये म्हणून सातत्याने व्हिडिओ जारी करून धमक्या देत आहेत. या धमक्यांची पर्वा न करता काश्मीरमधील तरुणांनी मोठ्या संख्येने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी अर्ज दाखल करून दहशतवाद्यांना तडाखेबाज उत्तर दिले आहे. यापैकी ३५ हजार ७२२ तरुण काश्मीरमधील असून ३१ हजार ४९६ तरुण जम्मू विभागातील आहेत.
विशेष म्हणजे ६ हजारांहून अधिक काश्मिरी तरुणी हिंमत दाखवून या पदासाठी शारीरिक चाचणीसाठी आल्या. रूढीवादी समाजाची सर्व बंधने तोडून काश्मीर तरुणी या भरती मोहिमेत सहभागी झाल्या, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस संचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
उपनिरीक्षकपदासाठी इच्छुक असलेली नुसरत जान ही श्रीनगर येथील आहे. ती म्हणाली की, स्थानिक महिलांना मदत करण्याची माझी इच्छा आहे. अतिरेकी कारवायांमुळे काश्मीर खोऱ्यातील महिलांना खूपच त्रास सोसावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करणे जरुरी आहे, असे मोठ्या धाडसाने सांगत तिने सुरक्षा दलात काम करण्याचा ठाम इरादा व्यक्त केला.
पोलीस सेवेत दाखल होऊन दहशतवादामुळे समाजाला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाचा मुकाबला करण्यात मला मदत होईल, असे परखड मत रुबीना अख्तर या तरुणीने व्यक्त केले. मला पोलीस सेवेत काम करण्याची संधी मिळाली तर मी नशीबवान ठरेल, असे फर्जाना हिने म्हटले आहे.
विज्ञान शाखेचा पदवीधर असलेला रफिक भट म्हणाला की, काश्मीर खोऱ्यातील पोलीस सातत्याने दहशतवाद्यांच्या धोक्याखाली वावरत असतात. याची जाणीव असूनही माझी या संकटाला सामोरे जाण्याची तयारी आहे. अतिरेक्यांचा मार्ग योग्य नाही. या रोगावर योग्य उपचार करणे गरजेचे आहे.