पाकिस्तानी ध्वजामुळे काश्मीर धुमसले!

By admin | Published: April 17, 2015 01:57 AM2015-04-17T01:57:41+5:302015-04-17T01:57:41+5:30

तीव्र पडसाद देशभरात उमटल्यानंतर अखेर काश्मीर सरकारने गुरुवारी रात्री जहाल फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी आणि मसरत आलम भट यांना नजरकैदेत ठेवले.

Kashmiris smile due to the Pakistani flag! | पाकिस्तानी ध्वजामुळे काश्मीर धुमसले!

पाकिस्तानी ध्वजामुळे काश्मीर धुमसले!

Next

देशद्रोह्यांविरोधात देशभरात संताप

फुटीरवादी गिलानी, मसरत आलम भट अखेर नजरकैदेत

जम्मू-काश्मीर सरकारची कारवाई

नवी दिल्ली/श्रीनगर : पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावत मिरवणुकीने सभेला जाण्याच्या फुटीरतावाद्यांच्या कृतीचे तीव्र पडसाद देशभरात उमटल्यानंतर अखेर काश्मीर सरकारने गुरुवारी रात्री जहाल फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी आणि मसरत आलम भट यांना नजरकैदेत ठेवले.
श्रीनगरमध्ये जाहीर सभेत पाकिस्तानचे ध्वज फडकाविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनीही वाढत्या दबावापुढे नमते घेत फुटीरवाद्यांचे हे वागणे अजिबात सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. राज्य भाजपानेही सरकारवर दबाव वाढविला आणि केवळ गुन्हा दाखल करणे पुरेसे नाही तर गिलानी आणि मसरत आलमला त्वरित अटक करा, अशी मागणी केली होती. अखेर रात्री उशीरा या दोन्ही फुटीरवाद्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. फुटीरवाद्यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली.
दुसरीकडे गिलानी आणि मसरत आलमविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या निर्णयाचा हुर्रियत कॉन्फरन्सने निषेध केला. तसेच फुटीरवाद्यांचे हे कृत्य पाकबद्दल काश्मिरींच्या प्रेमाचे दर्शक असल्याची प्रतिक्रिया पाकने दिली आहे.

गिलानींच्या सभेविरुद्ध ठिकठिकाणी निदर्शने
गिलानी यांची जाहीर सभा आणि पाकिस्तान समर्थनात नारेबाजीच्या घटनेचे जम्मूच्या अनेक भागांत तीव्र पडसाद उमटले. आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने करून गिलानी आणि आलमच्या अटकेची मागणी केली. क्रांतिदलाच्या बॅनरखाली शंभरावर निदर्शकांनी येथील मुख्यमंत्री सईद आणि पाकिस्तानविरुद्ध नारेबाजी केली. जम्मू पश्चिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान, सईद आणि फुटीरवाद्यांचे पुतळे जाळले.

...म्हणे झेंडा फडकवला नाही
फुटीरवादी आलमने आम्ही केवळ काश्मिरी जनतेच्या आकांक्षा जाहीर करीत होतो, असा दावा केला आहे. गिलानींच्या स्वागताचा कार्यक्रम होता आणि काही युवकांजवळ पाकिस्तानी झेंडे होते. परंतु मी पाकिस्तानी झेंडा हाती घेतला नव्हता त्यामुळे मला यासाठी दोषी ठरविता येणार नाही, असेही त्याचे म्हणणे आहे.

भारतीय भूमीवरून पाकिस्तान जिंदाबादचे नारे कदापि सहन केले जाणार नाहीत. कालच्या घटनेबद्दल मी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री सईद यांच्यासोबत चर्चा केली आहे. आम्ही योग्य ती कारवाई करू.
- राजनाथ सिंह,
केंद्रीय गृहमंत्री

काश्मीरमध्ये फुटीरवाद आणि पाकिस्तानला असलेले समर्थन हे एक वास्तव आहे आणि आम्हाला यावर तोडगा काढावा लागेल. या लोकांना लोकशाहीतील अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही.
- वाहिद रहमान पर्रा,
प्रवक्ता, पीडीपी

फुटीरवाद्यांची मुजोरी
जम्मू-काश्मीर सरकारने तब्बल पाच वर्षांनंतर गिलानींना जाहीर सभेची परवानगी दिली होती. बुधवारी झालेल्या या सभेत गेल्याच महिन्यात कारागृहातून बाहेर पडलेल्या फुटीरवादी मसरत आलमसह अनेक समर्थकांनी हातात पाकिस्तानी झेंडे घेऊन पाकिस्तान समर्थनात
नारेबाजी केली होती.

Web Title: Kashmiris smile due to the Pakistani flag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.