दहशतवादी कासिम ठार!
By admin | Published: October 30, 2015 01:39 AM2015-10-30T01:39:40+5:302015-10-30T01:39:40+5:30
उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तय्यबाचा वरिष्ठ कमांडर अबू कासिम याचा गुरुवारी सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील चकमकीत खात्मा केला.
श्रीनगर : उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तय्यबाचा वरिष्ठ कमांडर अबू कासिम याचा गुरुवारी
सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील चकमकीत खात्मा केला. दोन महिन्यांपूर्वीच्या उधमपूर हल्ल्यासह काश्मीर खोऱ्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांत कासिमचा हात होता. कासिमला कंठस्नान घातल्याने काश्मिरातील लष्कर-ए-तय्यबाच्या कारवायांना पायबंद आणि विविध दहशतवादी संघटनांना हादरा बसणार आहे. परिणामी, सुरक्षा दलाचे हे मोठे यश मानले जात आहे.
पाकिस्तानच्या बहावलपूरचा रहिवासी कासिम (२८) आणि त्याचे सहकारी श्रीनगरपासून ८० किमी अंतरावरील कुलगामच्या खांदीपुरा गावातील एका घरात दडून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रात्री २ वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली. लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकाने गावाला वेढा घातला. कासिम व त्याच्या साथीदारांनी सुरक्षा दलाच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या वेळी उडालेल्या चकमकीत कासिम ठार झाला. त्याचे इतर सहकारी मात्र लपून बसले असून मोहीम अजूनही सुरू आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस. जे. एम. गिलानी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, कासिमच्या खात्म्याने सुरक्षा दलाला फार मोठे यश मिळाले आहे.
कोण आहे कासिम?
कासिमचे खरे नाव अब्दुल रहमान. तो या वर्षी ५ आॅगस्ट रोजी उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या पथकावर (बीएसएफ) झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता.
कासिम हा वाँटेड दहशतवाद्यांपैकी असून, पोलिसांनी त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. उधमपूर हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेनेही (एनआयए) त्याची माहिती देणाऱ्यास एवढ्याच रकमेच्या पुरस्काराची घोषणा केली होती.
७ आॅक्टोबर २०१५ला बांदीपुरात उपनिरीक्षक मोहम्मद अल्ताफ डार यांच्या हत्याकांडामागेही तोच होता.
महानिरीक्षक गिलानी यांनी सांगितले की, २०१३ साली हैदरपुरामध्ये कासिमच्याच नेतृत्वात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. यात
८ जवान शहीद झाले होते. कासिमचा खात्मा झाला असल्याने उधमपूर हल्ल्याचा तपास बंद करणार काय, असे विचारले असता या प्रकरणाचा तपास एनआयए करीत असल्याचे ते म्हणाले.