भयभीत नेपाळी सोडतायत काठमांडू
By admin | Published: April 27, 2015 11:20 PM2015-04-27T23:20:59+5:302015-04-27T23:20:59+5:30
शनिवारी आलेल्या विनाशी भूकंपानंतर दोन दिवस पाठोपाठ बसणारे भूकंपाचे धक्के , अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा यामुळे नेपाळी लोक बेजार व भयभीत झाले
काठमांडू : शनिवारी आलेल्या विनाशी भूकंपानंतर दोन दिवस पाठोपाठ बसणारे भूकंपाचे धक्के , अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा यामुळे नेपाळी लोक बेजार व भयभीत झाले असून, हजारोंच्या संख्येने लोक काठमांडू शहरातून बाहेर पडत आहेत.
काठमांडू शहरातून बाहेर पडण्याचे रस्ते माणसांनी फुलून गेले असूृन, ट्रॅफिक जाम होत आहे. अनेकांच्या हातात लहान मुले आहेत, लोक बस, कार मिळेल त्या मार्गाने काठमांडूबाहेर पडत आहेत.
पाणी व वीज यांचा तुटवडा
भूकंपग्रस्त भागात पाणी व वीज नाही. वीज व पाणी पुरवणे हे आमच्यासाठी मुख्य आव्हान आहे. त्यापाठोपाठ लोकांना अन्न पुरविले पाहिजे असे गृहमंत्रालयातील अधिकारी लक्ष्मीप्रसाद ढाकल यांनी सांगितले.
भारताने औषधे व आपत्ती प्रतिसाद दलाचे सदस्य पाठवले आहेत. चीनने आणीबाणी पथकाचे ६० सदस्य पाठवले आहेत. अमेरिका, ब्रिटन व आॅस्ट्रेलिया यांनी शहरी भागात ढिगाऱ्यातून शोध घेऊ शकणाऱ्या तज्ज्ञांची पथके व औषधे पाठविली आहेत; पण आंतरराष्ट्रीय मदत अद्याप भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचली नाही. कारण भूकंपाच्या पाठोपाठ बसणाऱ्या धक्क्यामुळे काठमांडूचा विमानतळ बंद ठेवावा लागत आहे.
४२०११ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, नेपाळची लोकसंख्या २८ दशलक्ष असून तिथे दर १० हजार नागरिकांसाठी फक्त २.१ डॉक्टर व ५० खाटांचे इस्पितळ आहे.
विमानतळावर गर्दी
४काठमांडू विमानतळावर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत असून, नेपाळबाहेर पडण्यासाठी लोक उतावीळ झाले आहेत. शनिवारच्या भूकंपानंतर लोक खुल्या जागेत झोपत आहेत, एक तर लोकांची घरे पडली आहेत किंवा भूकंपाच्या भीतीने घरात जाण्याचे लोकांचे धाडस होत नाही. काठमांडू शहरात व बाहेरच्या भागात लोकांनी रस्त्यावर गाद्या घातल्या आहेत.
पाऊस व ऊन यापासून सावली मिळावी म्हणून तंबू उभारले आहेत. बाहेरच्या देशातून येणारे पाणी मिळविण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. काही दुकाने आता उघडत आहेत, पण ती रिकामी आहेत.