Kathua Case: कठुआच्या लेकीसाठी लढणाऱ्या अॅड. दीपिका राजावत आहेत तरी कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 03:37 PM2018-04-18T15:37:14+5:302018-04-18T15:54:11+5:30
कठुआच्या लेकीवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्येचं प्रकरण उघडकीस आलं आणि एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे अॅड. दीपिका सिंह राजावत यांचं. धमक्या, दबाव सारं काही सहन करत, प्रसंगांना सामोरं जात त्यांनी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली ती एकाच निर्धारानं.
कठुआच्या लेकीवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्येचं प्रकरण उघडकीस आलं आणि एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे अॅड. दीपिका सिंह राजावत यांचं. धमक्या, दबाव सारं काही सहन करत, प्रसंगांना सामोरं जात त्यांनी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली ती एकाच निर्धारानं...कठुआच्या लेकीला न्याय मिळवून द्यायचाच! जम्मूच्या दीपिका सिंह राजावत. पेशानं वकील, सामाजिक कार्यात सुद्धा सक्रिय असतात. वॉइस फॉर राइट्स नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलं आणि महिलांसाठी दीपिका लढत असतात.
पाच वर्षांच्या मुलीची आई असलेल्या दीपिकाने कठुआच्या लेकीसाठी लढणं हे स्वाभाविकच ठरलं. याआधीही त्या अशा सामाजिक अन्याय-अत्याचारांच्या प्रकरणात मैदानात उतरल्या. कायदेशीर लढाईही लढल्या. एक बारा वर्षांची मोलकरीण मुलगी गायब झाली होती. दीपिका तिच्यासाठी पुढे सरसावल्या. न्यायालयातही गेल्या. धक्का बसेल मात्र त्यावेळी त्यांना जम्मू बार असोसिएशनने निलंबित केलं होतं. न्यायासाठी लढल्याचा 2012मध्ये बसलेला फटका दीपिका विसरू शकत नाहीत. मात्र त्याचवेळी आपलं कर्तव्यही! त्यामुळेच जेव्हा कठुआच्या लेकीचं प्रकरण पुढे आलं तेव्हा त्या स्वत: पीडित कुटुंबाला भेटल्या. त्यांच्या लेकीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली.
अर्थात इतर प्रकरणं आणि हे प्रकरण यात मोठा फरक. दीपिका राजावत वकील म्हणून लढतायत त्याचं कौतुक नाहीच पण त्यांना धमक्या आल्या. त्या शेवटी बोलल्याही, "मला बलात्काराच्या, ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला ठाऊक नाही मी जम्मूत कसं जगू शकेन. मला कदाचित न्यायालयात प्रॅक्टिसही करू देणार नाहीत. एका चिमुरड्या मुलीवर अमानुष अत्याचार होतात आणि तिला न्याय मिळवून देण्यातच अडथळे आणले जातात. यांना माणसं म्हणायचं तरी कसं?"
एकीकडे धमक्या, तर दुसरीकडे जगभरातून कौतुकही. त्यांचं एक छायाचित्र सध्या जगभर व्हायरल होतंय. अॅड. दीपिका सिंह राजावत...आत्मविश्वासानं परिपूर्ण...ठामपणे चालत...पुढे येत आहेत...आणि तिच्या सभोवतालचे पुरुष कुतूहलाने पाहत आहेत. प्रतिकूलतेशी सामना देत कमावलेला आत्मविश्वास असतोच तसा...साऱ्या विरोधाला पुरून उरत साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा!
I don't know till when I will be alive. I can be raped, my modesty can be outraged, I can be killed, I can be damaged. I was threatened yesterday that 'we will not forgive you'. I am going to tell SC tomorrow that I am in danger: Deepika S Rajawat, Counsel, Kathua victim's family pic.twitter.com/khXFELUqZe
— ANI (@ANI) April 15, 2018