Kathua Rape Case : कठुआ सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणाचा आज निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:17 AM2019-06-10T10:17:11+5:302019-06-10T10:21:35+5:30
जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा आज निकाल आहे. पठाणकोटमधील न्यायालय सोमवारी (10 जून) यावर निकाल देणार आहे.
पठाणकोट - जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा आज निकाल आहे. पठाणकोटमधील न्यायालय सोमवारी (10 जून) यावर निकाल देणार आहे. पठाणकोट न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी 3 जून रोजी झाली होती. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तेजविंदरसिंग यांनी दहा जून रोजी निकाल देऊ, असे सांगितले होते.
कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला काही महिन्यांपूर्वी ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले होतं. आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांचा समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू होती.
Punjab: Security heightened outside Pathankot court ahead of verdict in Kathua rape-murder case pic.twitter.com/XaCdsSMnKd
— ANI (@ANI) June 10, 2019
मुस्लीम समाजातील बकरवाल (मेंढ्या व घोडे पाळणारे) या भटक्या जमातीच्या बालिकेचे आठ वर्षे वयाच्या 10 जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अत्याचारानंतर तिची हत्या केली. 17 जानेवारीला जंगलात चिमुकलीचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली होती.
पीडितेच्या वकिलांना वारंवार धमकावण्यात येत होतं. त्यामुळे हे प्रकरण जम्मू काश्मीर राज्याबाहेरच्या न्यायालयात चालवण्यात यावं अशी याचिका पीडित कुटुंबियांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. आठ वर्षाच्या पीडित मुलीला न्याय देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकील दीपिका सिंह राजवंत यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दीपिका यांनी तशी भीती बोलून दाखवली. माझ्या जीवाला धोका असून माझ्यावर बलात्कार केला जाऊ शकतो, असं दीपिका सिंह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. एका चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी मी ही लढाई लढत आहे. मात्र, हा खटला घेतल्यापासून अप्रत्यक्ष माझ्यावर सर्वांनी बहिष्कारच घातला आहे. त्यामुळं या लढाईत मी किती दिवस टिकेन माहीत नाही, असे अशी हतबलता दीपिका सिंह यांनी व्यक्त केली होती. माझ्यासोबत काहीही होऊ शकतं. माझ्यावर बलात्कार होऊ शकतो. माझी हत्या केली जाऊ शकते किंवा माझी कोर्टातील प्रॅक्टिस थांबवली जाऊ शकते. सध्या मी अत्यंत भयंकर परिस्थितीतून जातेय. मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.