कथुआ बलात्कार : सात जणांवर आरोप निश्चित; १५ पानी आरोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:46 PM2018-06-07T23:46:33+5:302018-06-07T23:46:33+5:30
जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात भटक्या जमातीमधील आठ वर्षाच्या मुलीला मंदिरात कोंडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिचा खून केल्याच्या खटल्यात पठाणकोट जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी आठपैकी सात आरोपींवर आरोप निश्चित केले. आठवा आरोपी अल्पवयीन आहे.
पठाणकोट : जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात भटक्या जमातीमधील आठ वर्षाच्या मुलीला मंदिरात कोंडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिचा खून केल्याच्या खटल्यात पठाणकोट जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी आठपैकी सात आरोपींवर आरोप निश्चित केले. आठवा आरोपी अल्पवयीन आहे.
कथुआचे माजी महसुली अधिकारी संजीराम, विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया व सुरिंदर कुमार, संजी राम यांचा मुलगा विशाल जनगोत्रा व प्रवेश कुमार यांच्यावर खटला चालणार आहे. खटल्यातील महत्वाचे पुरावे नष्ट केल्याबद्दल पोलीस उप निरीक्षक आनंद दत्ता व जमादार तिलक राज यांनाही आरोपी करण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपी संजी राम याचा पुतण्या आहे.
काश्मीरमध्ये हा खटला निष्पक्षतेने चालणार नाही, अशी शंका पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्याने सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे रोजी हा खटला पठाणकोट न्यायालयात वर्ग केला. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर
सात दिवस रोजच्या रोज ‘इन कॅमेरा’ सुनवणी झाल्यानंतर न्यायालयाने खटला चालविण्यासाठी सात आरोपींवर आरोप निश्चित
केले. एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास खटल्यातून वगळण्यात आले. (वृत्तसंस्था)
काय आहेत आरोप?
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी १५ पानी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार गेल्या १० जानेवारीस या मुलीचे अपहरण केले गेले व एका छोट्या मंदिरात डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केले गेले. चार दिवस गुंगीच्या औषधांनी बेशुद्ध ठेवल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिचा खून केला गेला. निश्चित केलेल्या आरोपांत कट कारस्थान करणे, खून, बलात्कार व पुरावे नष्ट करण्यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे.