भाजपाचे मंत्री म्हणाले, कथुआ बलात्कार क्षुल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:46 AM2018-05-01T05:46:50+5:302018-05-01T05:46:50+5:30

मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, भाजपाचे नेते कविंदर गुप्ता यांनी कथुआ बलात्काराची घटना क्षुल्लक होती

Kathua Rape "Minor Incident", Says New J&K Deputy Chief Minister | भाजपाचे मंत्री म्हणाले, कथुआ बलात्कार क्षुल्लक

भाजपाचे मंत्री म्हणाले, कथुआ बलात्कार क्षुल्लक

Next

जम्मू : मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, भाजपाचे नेते कविंदर गुप्ता यांनी कथुआ बलात्काराची घटना क्षुल्लक होती, तिला महत्त्व देता कामा नये, असे धक्कादायक विधान केले. एवढेच नव्हे, तर कथुआ बलात्कारात सहभागी आरोपींच्या समर्थनार्थ झालेल्या मेळाव्यात सहभागी झालेले स्थानिक आमदार राजीव जसरोटिया यांनाही फेरबदलात भाजपाने मंत्री केले आहे.
नव्या उपमुख्यमंत्र्यांचे कथुआविषयीचे वक्तव्य व आरोपींची तरफदारी करणाऱ्या आमदाराला मंत्री करणे यामुळे भाजपा नेतृत्व देशाला हादरवून टाकणाºया घटनेकडे कसे पाहत आहे, हेच स्पष्ट होत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यावर आपण कथुआचे समर्थन करीत नसून, अशा घटना घडत असतात, असे आपणास म्हणायचे होते, अशी सारवासारव गुप्ता यांनी केली. या आधी केंद्रीय राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी कथुआ ही किरकोळ घटना असल्याचे विधान केले होते. या आधी आरोपींच्या समर्थनाच्या मेळाव्यास सहभागी झालेल्या दोन मंत्र्यांना भाजपाने राजीनामा देण्यास सांगितले होते.
कथुआ बलात्काराचे समर्थन हे
त्यांच्या राजीनाम्याचे कारण नसल्याचे
आज उघड झाले, असेही काँग्रेसने म्हटले आहे. उपमुख्यमंत्री असलेले निर्मलसिंह मवाळ आहेत आणि ते मुफ्ती यांना दबून असतात, अशी भावना भाजपामध्ये बळावत होती. नवे मंत्री आक्रमक असतील, हे भाजपाने पाहिले आहे. भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीही मंत्रिमंडळ फेरबदलाशी कथुआचा संबंध नसल्याचे जाहीर केले. सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे नवे चेहरे सरकारमध्ये आणले, असे ते म्हणाले.
जम्मूमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतपाल शर्मा व सांबातील देविंदर कुमार
मन्याल यांना मंत्री करताना राज्यमंत्री
सुनील शर्मा यांना कॅबिनेट मंत्रिपदी
बढती दिली आहे. पीडीपीचे मोहम्मद खलील बंड व मोहम्मद अशरश मीर यांचाही मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली.

पंतप्रधान मोदींच्या
तंबीनंतरही भाजपाचे वाचाळवीर सुसाट...
वादग्रस्त विधाने करून माध्यमांना मसाला पुरवू नका. जे काही बोलणार ते विचार करून बोला, अशी तंबी दिल्यानंतरही भाजपातील वाचाळवीर नेते सुसाट सुटले आहेत. बलात्काराच्या घटनांवर भाजपाचे नेत्यांची विवेकशून्य विधाने सुरूच आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाण्याची शक्यता आहे. येत्या कर्नाटक निवडणुकीत अशा वाचाळवीरांच्या वादग्रस्त विधानांचा मोठा फटका भाजपाला सहन करावा लागू शकतो.

पंतप्रधान म्हणाले होते...
अशा घटनांमुळे मान शरमेने खाली जाते, पण बलात्काराचे राजकारण करू नका.
राष्ट्रपती म्हणाले होते...
कथुआची घटना संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद; या घटनेची शरम वाटते.

निर्मल सिंह विधानसभाध्यक्ष
कविंदर गुप्ता हे आतापर्यंत विधानसभाध्यक्ष होते. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, कालपर्यंत उपमुख्यमंत्री असलेल्या निर्मल सिंह यांना विधानसभाध्यक्षपद दिले जाणार आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. निर्मलसिंह यांनी कालच उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

कथुआच्या घटनेमुळे दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. मात्र, त्या बदल्यात याच प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठीच्या रॅलीत सहभागी असणाºयाला मंत्री केले गेले. भाजपा आणि मेहबुबा मुफ्ती कथुआ प्रकरणी नेमकी संभ्रमात का आहे?
- ओमर अब्दुल्ला, नॅशलन कॉन्फरन्स

Web Title: Kathua Rape "Minor Incident", Says New J&K Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.