जिल्हाधिकारी मागच्या दाराने वर्गात येऊन बसले, शिक्षकाची नजर पडताच...पाहा पुढे काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:54 PM2022-04-15T12:54:33+5:302022-04-15T12:55:48+5:30
Katihar Dm In Classroom: कटिहारच्या जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांची पाहणी केली. यावेळी एक वेगळीच घटना पाहायला मिळाली.
कटिहार:बिहारमधील कटिहार जिल्ह्यातून एक आश्चर्यचकीत घटना समोर आली आहे. कटिहारचे जिल्हाधिकारी उदयन मिश्रा मागच्या दाराने गुपचुप एका शाळेतील वर्गात शिरले आणि विद्यार्थ्यांसोबत शेवटच्या बाकावर बसून शिक्षकाचे बोलणे ऐकत होते. त्यावेळी नितीश नावाचे शिक्षक भौतिकशास्त्र शिकवत होते. यावेळी नितीश यांची नजर वर्गातल्या बसलेल्या अनोळखी व्यक्तीवर पडताच, त्यांनी विचारले तूम्ही कोण?
त्यावर जिल्हाधिकारी उदयन मिश्रा यांनी आपली ओळख करून दिली. यानंतर शिक्षकांसह वर्गात उपस्थित विद्यार्थीही आश्चर्यचकित झाले. यावेळी जिल्हाधिकारी उदयन मिश्रा शिक्षकाच्या शिकवण्याच्या पद्धतीवर खूश झाले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना काही भौतिकशास्त्राचे प्रश्नही विचारले. विद्यार्थ्यांची अचूक उत्तरे ऐकून जिल्हाधिकाऱ्यांना खूप आनंद झाला. कुरसेला येथील अयोध्या प्रसाद विद्यालयातील ही घटना आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली शाळांची पाहणी
मुख्य सचिवांच्या सूचनेवरून कटिहारचे जिल्हाधिकारी उदयन मिश्रा आणि सर्व उच्च अधिकारी शाळांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. मिश्रा स्वतः कुरसेला येथील अयोध्या प्रसाद विद्यालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते. तिथे ते मागच्या दाराने वर्गात गेले आणि शेवटच्या बाकावर बसले. या घटनेची आता संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.