बिहारसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर काटजूंनी मागितली माफी
By admin | Published: September 29, 2016 08:43 AM2016-09-29T08:43:48+5:302016-09-29T08:43:48+5:30
बिहारसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी अखेर माफी मागितली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - बिहारसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी अखेर माफी मागितली आहे. बुधवारी काटजू यांनी फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करत माफी मागितली. कोणाला दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, आपण फक्त विनोद करत होतो असं काटजू यांनी म्हटलं आहे. काटजू यांनी 'पाकिस्तानला एका अटीवर काश्मीर देण्यास आम्ही तयार आहोत, त्यांना काश्मीरसोबत बिहारही घ्यावा लागेल,' अशी फेसबूक पोस्ट केली होती. ज्यानंतर त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
बुधवारी काटजू यांनी फेसबूकच्या माध्यमातून माफीनामा लिहिला. 'मी बिहारसंबंधी केलेलं वक्तव्य एक विनोद होता. मात्र लोकांनी त्याला वेगळ्या अर्थाने घेतल्याचं दिसतं आहे. त्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफ मागतो. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला बिहारी लोकांबद्दल खुप आदर असल्याचं म्हटलं आहे. मला चुकीच्या अर्थाने घेतलं जात आहे. गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्या, अशोका आणि डॉ राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या महान व्यक्ती आपल्याला बिहारकडून मिळाल्या आहेत', असं काटजू यांनी लिहिलं आहे.
काटजू वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले होते. अनेकांनी काटजू यांचं वक्तव्य बिहारचा अपमान करणारं असल्याचं म्हटलं होतं.
काय होती वादग्रस्त पोस्ट -
'पाकिस्तानवाल्यांनो एकदाच काय तो वाद संपवून टाकूया. आम्ही तुम्हाला काश्मीर द्यायला तयार आहोत, मात्र फक्त एकाच अटीवर, तुम्हाला बिहारदेखील घ्यावा लागेल. हे पॅकेज डील आहे. तुम्हाला सर्व पॅकेज घ्यावं लागेल नाहीतर काहीच मिळणार नाही. काश्मीर आणि बिहार एकत्र घ्या नाहीतर काहीच नाही. फक्त काश्मीर आम्ही तुम्हाला देणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी आग्रा भेटीत मुशर्रफ यांना अशीच एक डील ऑफर केली होती. पण मुर्खासारखी त्यांनी नाकारली. तुम्हाला पुन्हा ऑफर मिळत आहे. यावेळी चुकू नका,' असं काटजू यांनी लिहिलं होतं.