काटजू, हाजीर हो..!
By admin | Published: October 18, 2016 06:12 AM2016-10-18T06:12:57+5:302016-10-18T06:12:57+5:30
केरळमधील सौम्या या मुलीच्या खुनाबद्दल आरोपीला निर्दोष ठरविणाऱ्या आपल्या निकालावर निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी समाजमाध्यमांतून केलेल्या जहरी टीकेची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दखल घेतली
नवी दिल्ली : केरळमधील सौम्या या मुलीच्या खुनाबद्दल आरोपीला निर्दोष ठरविणाऱ्या आपल्या निकालावर निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी समाजमाध्यमांतून केलेल्या जहरी टीकेची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दखल घेतली आणि काटजू यांनी ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयापुढे स्वत: हजर होऊन हा निकाल कसा चुकीचा आहे, हे पटवून द्यावे, असे फर्मान सोडले. आपल्याच एका माजी न्यायाधीशाविरुद्ध ‘हाजीर हो’ असा पुकारा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
न्या. काटजू यांनी १७ सप्टेंबर रोजी एक ब्लॉग लिहून या निकालात मूलभूत दोष आहे व कायद्याच्या विद्यार्थ्यांना कळतो तेवढाही कायदा न्यायाधीशांना कळत नाही, अशी टिका केली होती. या निकालाविरुद्ध केरळ सरकार आणि मयत सौम्याच्या आईने फेरविचार याचिका केल्या आहेत. त्या सोमवारी सुनावणीसाठी आल्या तेव्हा न्या. रंजन गोगोई, न्या. पी. सी. पंत व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठाने काटजू यांच्या या ब्लॉगची दखल घेतली आणि काटजू यांनी अशा प्रकारे कोर्टाबाहेर मते मांडण्याऐवजी न्यायालयापुढे उभे राहून कायद्याच्या मुद्द्यांवर कोण बरोबर व कोण चूक, याचा वादविवाद करावा, असा आदेश दिला.
>काय लिहिले होते ब्लॉगमध्ये
निकालातील या निष्कर्षावर टिका करताना काटजू यांनी ब्लॉगमध्ये लिहिले होते की, ऐकिव माहितीवर विश्वास ठेवून काढलेला हा निष्कर्ष आहे.
ऐकिव माहिती हा न्यायालयात ग्राह्य पुरावा होत नाही, हे कायद्याच्या विद्यार्थ्यालाही कळते.
परंतु आयुष्याची अनेक दशके कायद्याच्या क्षेत्रात घालविलेल्या विद्वान न्यायाधीशांनी दंड प्रक्रिया संहितेचे कलम ३०० वाचले नसावे, असे वाटते.