कटप्पा रणांगणात... पुतळे तोडणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना लढाईचं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 11:00 AM2018-03-08T11:00:17+5:302018-03-08T11:08:29+5:30
पेरियार हे केवळ एक मूर्ती नव्हेत. ते केवळ हाडामांसांने बनलेले शरीरही नाही. तर पेरियार हा एक विचार आहे.
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून साम्यवादांचा आदर्श असणाऱ्या लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला होता. देशभरात या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे भाजपा आणि विरोधकांकडून एकमेकांच्या आदर्श नेत्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे सत्र सुरू झाले होते. कालच मेरठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तर तामिळनाडूत काही समाजकंटकांनी समाजसुधारक पेरियार यांच्या पुतळ्याची नासधुस केली होती. या पार्श्वभूमीवर 'बाहुबली' चित्रपटातील कटप्पा फेम अभिनेता सत्यराज यांनी भाजपाला फटकारले आहे.
सत्यराज यांनी एका चित्रपटात पेरियार यांची भूमिकाही साकारली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला. या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे की, त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याच्या घटनेचा मी निषेध करतो. तामिळनाडूतील भाजपा नेते एच.राजा यांनीदेखील पेरियार यांचा पुतळा पाडण्याची भाषा केली होती. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे. पेरियार हे केवळ एक मूर्ती नव्हेत. ते केवळ हाडामांसांनी बनलेले शरीरही नाही. तर पेरियार हा एक विचार आहे. कष्टकरी आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठीची आणि अंधविश्वास संपविणारी ती एक विचारधारा आहे. त्यामुळे पेरियार नेहमी आपल्या मनात राहतील, असे सत्यराज यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
तसेच आम्ही पेरियार विरोधकांचे आव्हान स्वीकारत असल्याचेही त्यांनी म्हटले. विरोधकांनी केवळ आम्हाला दिवस आणि तारीख सांगावी. एच.राजा यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे. अन्यथा तामिळनाडू सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असे सत्यराज यांनी सांगितले.
Actor Sathyaraj about Lenin Periyar Statues issue #PeriyarStatuepic.twitter.com/cWvyh1dWeX
— IndiaGlitz - Tamil (@igtamil) March 7, 2018